सातारा : संग्रहालयाच्या जागेत चार्जिंग स्टेशनचा घाट | पुढारी

सातारा : संग्रहालयाच्या जागेत चार्जिंग स्टेशनचा घाट

सातारा; विशाल गुजर :  तब्बल 50 वर्षानंतर छत्रपती शिवाजी संग्रहालयाला स्वत:च्या मालकीची इमारत मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, त्यात खोडा घालून कास पठारावर सुरू होणार्‍या ई-बसचे चार्जिंग स्टेशन या जागेत सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संग्रहालयाच्याच जागेत ई- बस चार्जिंग स्टेशनचा घाट का? असा संतप्त सवाल शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी करत आहेत. तसेच यासाठी अन्यत्र जागा शोधावी, अशी मागणी होत आहे.

सातार्‍यातून कास पठारावर जाण्यासाठी पीएमपीने चार बस देण्याची तयारी दर्शवली आहे. या ई-बसच्या चार्जिंग स्टेशनसाठी पीएमपीने संग्रहालयाच्या जागेची मागणी केली आहे. या वस्तूला दीर्घ प्रतीक्षेनंतर स्व मालकीची वास्तू उपलब्ध होत आहे. जागेअभावी संग्रहालयात असलेल्या अनेक दुर्मीळ वस्तू प्रेक्षकांसाठी खुल्या करता आलेल्या नाहीत. तसेच सध्याच्या इमारत नादुरूस्त झाल्याने अनेक वस्तू खराब झाल्या आहे. दोन वर्षांपासून दै. ‘पुढारी’ने जम्बो हॉस्पिटलची इमारत संग्रहालयास मिळावी, यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यानंतर याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मकता दाखवली आहे. असे असताना अचानक या जागेत ई-बसचे चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. एकदा या जागेत चार्जिंग स्टेशन उभे राहिल्यास तोच पायंडा पडून याच ठिकाणी त्याचे कायमचे बस्तान बसणार अशी भीती व्यक्त होत आहे.

संग्रहालय परिसरात बगीचा तयार केल्यास या वास्तूचे सौंदर्य वाढणार आहे. याच बागेत सातारा जिल्ह्यातील अनेक पुरातन वास्तू उदा. शिरवळची पाणपोई, पोवई नाक्यावरील मूळ पाणपोई, शहरातील ब्रिटिशकालीन विजेचे खांब, वीरगळ, शिलालेख यांची मांडणी केल्यास ते संग्रहालयाचे वेगळेपण ठरणार आहे. संग्रहालय सुरू झाल्यानंतर या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांच्या गाड्यांसाठी पार्किंगची सोय करावी लागणार आहे. त्यासाठी मोकळ्या जागेचा वापर होणार आहे.

वस्तूंची सुरक्षितता येवू शकते धोक्यात

या संग्रहालयात लाखो रुपये किमतीच्या शेकडो दुर्मीळ वस्तू आहेत. त्या वस्तूंची सुरक्षितता चार्जिंग स्टेशनमुळे धोक्यात येवू शकते. यासाठी संंग्रहालयाच्या देखण्या इमारतीमध्ये ई-चार्जिंग स्टेशन करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील अनेक मोकळ्या जागा उपलब्ध असताना संग्रहालयाच्याच जागेवर शासनाचा डोळा का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Back to top button