सातारा : मोठा नेता असल्याचा गैरसमज करून घेवू नका :  खा. उदयनराजे | पुढारी

सातारा : मोठा नेता असल्याचा गैरसमज करून घेवू नका :  खा. उदयनराजे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : तुमची राजकीय कारकिर्द एकदम आमदारकीपासून आणि आमची नगरसेवक पदापासून झाली आहे, ही वस्तुस्थिती बदलणारी नाही. समाजसेवा करताना, नगरसेवक पदापासूनच्या कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना नेहमीच समाजभान राहते. आव्हान स्वीकारण्याऐवजी पलायन करुन, पुन्हा बिनपुराव्याचे आरोप करायचे, आपणच आपली पाठ थोपटवून घ्यायची असले बिनकामाचे उद्योग बंद करावेत. फापटपसारा लावून, बोललं म्हणजे फार मोठा नेता आहोत, असा गैरसमज कोणी करून घेवू नये, अशा शब्दात खा. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्यावर पलटवार केला आहे.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, सातारा पालिकेच्या ज्या अधिकार्‍यांनी पैसे खाल्ले ते एसीबीच्या ट्रॅपमध्ये पकडले गेले. जे काही आहे त्यांचे ते अधिकारी भोगत आहेत. त्यांचे समर्थन केले नाही आणि करणारही नाही. त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. सातारा पालिकेची प्रशस्त इमारत असावी अशी आवश्यकता आपल्या कुपमंडूक प्रवृत्तीला, वाटणार नाही हे आम्हाला पटतंय. तीन लाख लोकसंख्या असली तर महापालिकेचा दर्जा मिळतो. भविष्याचा विचार करुन, आम्ही प्रशासकीय इमारतीची उभारणी करत आहोत. सातारकरांसाठी ही इमारत आवश्यक असल्याने ती मार्गी लावत आहोत. त्यासाठी 70 कोटी नव्हे आणखी काही रक्कम लागली तरी त्याची तजवीज आम्ही करुन घेवू त्याची काळजी तुम्ही करु नका, असा टोलाही उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना लगावला आहे.

खा. उदयनराजे पुढे म्हणाले, इमारतीसाठी कोट्यवधींची जागा नाममात्र किंमतीमध्ये पालिकेच्या नावे करण्याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. या ठिकाणावर आरक्षण बदलून रितसर जागा खरेदी केली आहे. पूर्वीचे आरक्षण भ्रष्टाचार झाल्यानेच विकसित गेले नाही. आता 21 वे शतक आहे पण काही व्यक्ती खुलेआमपणे भ्रष्टाचार व समाजघातक कृत्य करतात. म्हणूनच राजेशाही असती तर हत्तीच्या पायी दिले असते. सुळावर चढवले असते, कडेलोट केला असता असे आम्ही वेळोवेळी बोललो आहोत. त्यामुळे हे 17 वे शतक नाही हे सिध्दच होत आहे. परंतु, तुम्हाला ते समजले नाही. आमच्या हातात कोणती सत्तास्थाने राहिली तर तुमच्या समान कोणत्याही भ्रष्टाचार्‍यांचा मुलाहिजा ठेवणार नाही याची तुम्हाला अनामिक भीती वाटत आहे.

तुम्हाला लोकहिताचे पाऊल उचलता आले नाही. बायोमायनिंगसह, घनकचरा व्यवस्थापनाव्दारे विविध उपक्रमांची सार्वजनिक आरोग्याच्या हिताकरता आम्ही सुरूवात केली. राजपथावरचा उजेड करंज्यात पडल्याचे तुम्हाला दिसले यावरुन तुमची खुजी वृत्तीच दिसत आहे. मी कुचकं बोलायचो असे तुम्ही म्हणतात. परंतु, ते तसे नाही. तुम्हाला नेहमी कुचकंच ऐकायची सवय लागली आहे ही त्यामधील खरी मेख आहे, असेही खा. उदयनराजेंनी म्हटले आहे.

यूज अ‍ॅण्ड थ्रो ही तर तुमची मनोवृत्ती…

घरकुल योजनेच्या ठेकेदाराला रितसर ठेका मिळाला आहे. ज्यांना तुम्ही देशोधडीला लावणार होता त्यांना आता घरकुले मिळवून त्यांना जगण्याची नवी दिशा देण्याचे काम करत आहे. ग्रेडसेप्रेटरमुळे आज वाहतुकीचा खोळंबा होत नाही हे वास्तव आहे. हे काम आपले नाही, अशी कबुली तुम्ही दिली आहे. शहापूर योजना स्वत:च्या स्वार्थासाठी सातारकरांच्या माथी मारली आहे. शहापूर योजना खर्चिक असेल तर आता बंद करा असे आज म्हणणे म्हणजे करुन करुन भागला आणि देवपूजेला लागला अशा तुमच्या युज अ‍ॅन्ड थ्रो मनोवृत्तीचे प्रतिक आहे. काहीतरी बोलायचे म्हणून तुम्ही आरोप करत असल्याची स्वतःहून कबुलीच दिली आहे. म्हणूनच तुमच्या या वरपांगी भ्रष्ट बडबडीला शून्य किंमत असल्याची टीकाही उदयनराजे यांनी केली आहे.

Back to top button