सातारा : कण्हेर धरणावर गणरायाला भक्तिभावाने निरोप | पुढारी

सातारा : कण्हेर धरणावर गणरायाला भक्तिभावाने निरोप

कण्हेर; पुढारी वृत्तसेवा : ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात शुक्रवारी आनंत चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणरायाला कण्हेर धरणावर भक्तीभावाने निरोप देण्यात आला. ग्रामीण परिसरासह शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गणेश भक्तांची कण्हेर धरणावर अलोट गर्दी उसळली होती. पुढच्या वर्षी लवकर या चे साकडे घालत विघ्नहर्ता बाप्पांना उत्साहात भक्तांनी निरोप दिला. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका गुलालाची उधळण करत पारंपारिक वाद्यांच्या गजरात शांततेत पार पडल्या.

ग्रामीण भागात 11 दिवसांच्या पाहुणचारानंतर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरगुती व सार्वजनिक गणेश विसर्जन पार पडले. दुपारी दोन वाजल्यापासूनच गणेश विसर्जनाला सुरुवात झाली होती. वातावरणातील बदल व पावसाचे सावट असल्याने अनेकांनी सांयकाळ होण्यापूर्वी गणेश विसर्जन करण्यावर भर दिला. यावेळी वेळे, कामथी, अगुंडेवाडी, जोतिबाची वाडी, चोरगेवाडी, कण्हेर, जांभळेवाडी, गणेशनगर, साबळेवाडी, गवडी, नुने, कळंबे, चिंचणी, माळयाचीवाडी, आकले, नेले, किडगाव, सारखळ आदी सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकीत महिलांनीही फेर धरून झिम्मा-फुगड्या खेळल्याने भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. युवक भक्तही वाद्यांच्या तालात ठेका धरत गुलालात तल्लीन झाले होते.

कोरोनाचे निर्बंध नसल्याने व यंदा चांगला पाऊस झाल्याने विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली. धरणकाठी गणेशमूर्तींची विधीवत पूजा व आरती करून विसर्जन करण्यात आले. यावेळी काहींनी बोटीतून गणेशमूर्ती नेऊन बाप्पांना निरोप दिला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तालुका पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी सहा नंतर वरूनराजाने दमदार हजेरी लावली होती. भर पावसातही भक्तांचा आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता.

 

Back to top button