अमरावतीची युवती सातार्‍यात सापडली; लव्ह जिहाद प्रकरण? | पुढारी

अमरावतीची युवती सातार्‍यात सापडली; लव्ह जिहाद प्रकरण?

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : अमरावतीमध्ये दोन दिवस ‘लव्ह जिहाद’वरून तणाव असताना त्यातील 19 वर्षीय युवती बुधवारी रात्री दहा वाजता सातारा रेल्वे स्टेशनवर सापडली. रेल्वे व सातारा पोलिसांनी तिचा ताबा घेतल्यानंतर गुरुवारी सकाळी अमरावती पोलिसांकडे त्या युवतीचा ताबा देण्यात आला. दरम्यान, सातारा पोलिसांनी तोंडावर बोट ठेवले तर अमरावती पोलिसांनी कानावर हात ठेवल्याने तपास गुलदस्त्यात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अमरावती शहरातील 19 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तिच्यावर लव्ह जिहादचे जाळे टाकल्याची चर्चा शहरात पसरली. यातूनच बुधवारी दुपारी खा. नवनीत राणा व हिंदुत्ववादी काही संघटनांनी अमरावती पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस अधिकार्‍यांना धारेवर घडले. पोलिस ठाण्यातच हमरीतुमरी व आदळआपट झाली. पोलिस ठाण्यात घडलेल्या अभूतपूर्व गोंधळाचे चित्रीकरण समाजमाध्यमावर झळकत होते. अमरावती पोलिस यामुळे अधिक सतर्क झाले व बेपत्ता युवतीचा शोध घेण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता युवती सातारा दिशेने जात असल्याची अमरावती पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली.

अमरावती पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ सातारा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याशी संपर्क साधला. मुलीचे वर्णन, फोटो सातारा पोलिसांना मिळाल्यानंतर पुढील शोधमोहीम राबवण्याची जबाबदारी एलसीबीचे सपोनि रमेेश गर्जे यांच्याकडे सोपवण्यात आली. सातारा पोलिसांनी तात्काळ पथक तयार करुन महिला पोलिस सोबत घेतले. दरम्यानच्या काळात युवती रेल्वेमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सातारा रेल्वे पोलिसही सतर्क झाले. बुधवारी रात्री 10 वाजता सातारा रेल्वे स्टेशनवर एक रेल्वे आल्यानंतर तात्काळ सर्च ऑपरेशन राबवण्यात आले व संबंधित वर्णनाची युवती पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी 19 वर्षीय युवतीला ताब्यात घेतले.

तोपर्यंत सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) पथकही रेल्वे स्टेशनवर पोहचले. संबंधित युवती सुखरुप होती. तिच्यासोबत कोणी आहे का? तिचा पाठलाग कोण करतय का? तिच्यावर कोणी लक्ष ठेवून आहे का? ती स्वत:हून आली आहे की जबरदस्तीने तिला कोणी आणले आहे? अशा सर्व प्रश्‍नांची उकल करण्याचा सातारा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र ती युवती फारशी बोलत नव्हती. यावेळी महिला पोलिसांनीही तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. बेपत्ता युवती सातार्‍यात सापडल्याचे अमरावती पोलिसांना सांगण्यात आले. त्यानुसार मध्यरात्री अमरावती पोलिस सातार्‍याकडे रवाना झाले.

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अमरावती पोलिस सातार्‍यात दाखल झाले. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये सातारा पोलिसांनी त्या युवतीला पुन्हा बोलते करण्याचा प्रयत्न केला असता तिने तोकडी माहिती पोलिसांना दिली की, माझी कोणाविरुध्द तक्रार नाही, असा जबाब दिला. यानुसार सातारा पोलिसांनी युवतीला ताब्यात घेवून तिने दिलेल्या माहितीवरुन रिपोर्ट तयार केला. गुरुवारी दुपारी अमरावती पोलिसांनी सातार्‍यातून त्या युवतीचा ताबा घेतला व ते रवाना झाले. यामुळे नेमकी भानगड काय? हे समोर आलेले नाही.

इन्स्टाग्राममुळे सातारा लोकेशन ट्रेस

अमरावतीमध्ये लव्ह जिहाद प्रकरणावरून संवेदनशील वातावरण झाल्याने तेथील पोलिस टेन्शनमध्ये होते. मुलीला संपर्क साधण्यासाठी व तिचे लोकेशन घेण्यासाठी पोलिस प्रयत्न करत असताना युवतीने मोबाईलमधून सिमकार्ड काढलेे होते. अमरावती पोलिस यामुळे हैराण झाले असताना सोशल मीडियावर त्यांनी फोकस केल्यानंतर क्ल्यू मिळाला. युवतीने पुणे येथे असताना इन्स्टाग्रामवर एकाला सातारा येथे निघाले असल्याचा मेसेज केला होता. मेसेजची वेळ पाहिल्यानंतर अमरावती पोलिसांनी ती संधी साधून सातार्‍यावर लक्ष केंद्रीत केले आणि युवती सापडली.

Back to top button