सातारा : महाबळेश्‍वर बसस्थानकात बॉम्ब असल्याची अफवाच | पुढारी

सातारा : महाबळेश्‍वर बसस्थानकात बॉम्ब असल्याची अफवाच

महाबळेश्‍वर; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्‍वर बसस्थानकातील एका चारचाकी वाहनात बॉम्ब असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिल्याने महाबळेश्‍वरात एकच खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी व बुधवारी दुपारपर्यंत विविध पथकांकडून बॉम्बचा शोध घेण्यात आला. परंतु, कुठेही बॉम्ब अथवा बॉम्बसदृश वस्तू आढळून न आल्याने महाबळेश्‍वरवासीयांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, निनावी फोन करून बॉम्बबाबत माहिती देणार्‍या विरोधात महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महाबळेश्‍वर बसस्थानकात बॉम्ब असल्याची अफवाच असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी, महाबळेश्‍वर बसस्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचा फोन अज्ञाताने मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वाहन क्रमांकासह पोलिसांना केला होता. यानंतर महाबळेश्‍वर पोलिसांनी तातडीने बसस्थानक, आगार परिसराची तपासणी केली. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. मंगळवारी रात्रीपासून बसस्थानकात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या माहितीची खातरजमा करण्यासाठी बुधवारी पुन्हा सातारा येथून दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक व श्‍वान पथकांना पाचारण करण्यात आले होते.

या पथकांनी बसस्थानकातील प्रत्येक वाहनांसह प्रवाशांच्या साहित्याचीही तपासणी केली. तसेच आगारासमोरील टॅक्सीतळ व परिसराचीही तपासणी करण्यात आली. मात्र कोठेच काही सापडले नाही. पोलिसांच्या या शोधमोहिमेमुळे प्रवाशांसह महाबळेश्‍वरमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, महाबळेश्‍वर बसस्थानकात बॉम्ब असल्याची अफवाच असल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.

Back to top button