भविष्यात शेती करणार तरी कोण? | पुढारी

भविष्यात शेती करणार तरी कोण?

सातारा : पुढारी वृत्तसेवा कृषी प्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारतात शेतीला महत्त्व आहे. मात्र, बेभरवशाच्या पावसामुळे बळीराजाने गुडघे टेकल्याचे दिसत आहे. शेतकर्‍याला बदलत्या परिस्थितीत घडामोडींचाही फटका बसत आहे. पारंपरिक अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सर्जा-राजाच्या खिलारी जोडीचे अस्तित्व तर नावालाच उरले आहे. ट्रॅक्टर आणि त्याच्या विविध अवजारांच्या दुनियेत शेती भरकटली आहे. तरुण वर्गाचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन, वाढते शहरीकरण व पारंपरिक शेतीकडे होत आलेले दुर्लक्ष यामुळे भविष्यात शेती करणार तरी कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भल्या पहाटे डोक्यावर पारंपरिक नांगर, खांद्यावर घोंगडी, पुढे सर्जा – राजाची जोडी हाकत शेताच्या दिशेने पावले टाकणारा बळीराजा शेतात उभा राहून आधुनिक यंत्राद्वारे होणारी नांगरणी व इतर अवजारांची करामत पाहत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतामध्ये नांगरणीसाठी राबराब राबणारी सर्जा-राजाची जोडी हाकताना शेतकर्‍यांच्या मुखातून घुमणारा आवाज अर्थात भलरीही संपली आहे. आज अत्याधुनिक यंत्रांचा आवाज शिवारात घुमत आहे. ग्रामीण व खेड्यापाड्यातील सर्रास शेतकर्‍यांनी शेतीसाठी आधुनिक साधनांचा वापर करण्यास सुरुवात केल्याने नांगर फाळ, कुळव, कुरी आदि पारंपरिक साधने दिसेनाशी होवू लागली आहेत.

बळीराजाने परवडेना या सबबीवर बैलजोड्यांकडे पाठ फिरवल्याने पारंपारिक कृषी संस्कृती धोक्यात आली आहे. शेतीची सारी कामे आता यंत्रेच करत आहेत. जुनेजाणते शेतकरीही आता जवळपास संपल्यात जमा असून वृध्दावस्थेकडे झुकलेले हे शेतकरी गावागावात जुन्या जमान्यातील शेतीच्या आठवणी जागवत असताना दिसतात.

आज सर्वसामान्य शेतकर्‍यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असून यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येवू लागला आहे. शेतीच्या मशागतीसाठी व श्रमाच्या कामांसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलरसारख्या यंत्रांचा उपयोग करण्यात येत आहे.

आधुनिक शेतीतूनही तोटेच अधिक

शेतातील कामे यांत्रिकीकरणामुळे सोपी व जलद होत असल्याने त्याचा फायदाही शेतकर्‍यांना मिळत आहे. पारंपरिक शेती व्यवसायात आधुनिक यंत्र सामुग्रींनी केलेली आगेकूच पाहता शेतीतून मिळणार्‍या उत्पन्‍नापेक्षा बळीराजाच्या खिशाला ती अधिक चाट देणारी आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शेती मशागतीसाठी होणारा खर्च, रासायनिक खते, कीटकनाशके, जास्त पीक देणारी बी-बियाणे, मजुरांची देणी अशी शेतीच्या खर्चात भरमसाठ वाढ झाली असून त्या बदल्यात मिळणारे उत्पन्‍न आणि हमीभाव याची शाश्‍वती देता येत नाही. शेतीचे वेगाने आधुनिकीकरण होत असताना शेती अडचणीत आल्याचा विरोधाभास व्यक्‍त होत असतो.

हेही वाचा

Back to top button