महाबळेश्वर : पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले; पती फरार | पुढारी

महाबळेश्वर : पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले; पती फरार

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून राजेंद्र ऊर्फ राजू महादेव जाधव याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर संशयित तेथून पळून गेला. या घटनेने अवघे महाबळेश्वर हादरले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

महाबळेश्वर येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र. 1 च्या पाठीमागे एका चाळीत घोडे व्यवसाय करणारा राजेंद्र जाधव हा आपली पत्नी बायना व चार मुलांसह राहत होता. राजेंद्र हा नेहमीच दारूच्या नशेत असतो. तो रोज आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत. बुधवारी सकाळी पती घरी नसताना पावणे आठच्या दरम्यान पत्नी नैसर्गिक विधीसाठी गेली होती.

काही वेळाने पती राजेंद्र घरी आला. त्याने पाहिले की, पत्नी घरात नाही व सर्व मुले झोपली आहेत. त्याने आपल्या घराला बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर घराशेजारी असलेल्या एका गल्लीत तो आपल्या पत्नीची वाट पहात उभा राहिला. त्यावेळी त्याच्या हातात प्लास्टिकचा एक मग होता.

पत्नी बायना घरी निघाली असता वाटेत पती उभा असलेला तिला दिसला. पत्नी जवळ येताच राजेंद्रने आपल्या हातातील मगमध्ये असलेले पेट्रोल पत्नीच्या अंगावर टाकले. हे करत असताना तो शिवीगाळ करून तुला आज मारून टाकतो, असे तिला म्हणाला. त्याचवेळी त्याने पत्नीच्या अंगावरील साडीला आग लावली. पत्नी बायनाला क्षणात आगीने वेढले. तिने आरडाओरडा सुरु केला. यावेळी राजेंद्रने तेथून पळ काढला. हा आवाज ऐकूण चाळीतील लोक धावतच बाहेर आले. बाहेरील दृश्य पाहून लोकांचा थरकाप उडाला. यावेळी सचिन सपकाळ व इतरांनी समयसुचकता दाखवत महिलेच्या अंगावर पाणी टाकले.

आईचा आरडा ओरडा ऐकूण तिची मुले जागी झाली. परंतु, घराला राजेंद्रने बाहेरुन कुलुप लावले होते. कशीतरी मुले घरातून बाहेर पडली तेव्हा आई भाजल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्थानिक लोकांच्या मदतीने मुलांनी आपल्या आईला येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी बायना जाधव यांना सातारा येथील शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले.

वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे-खराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक एक्सपर्ट व ठसे तज्ञांना पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले होते. पोलिसांनी घटना स्थळावरून मंगळसूत्र तसेच इतर साहित्य गोळा केले.

दरम्यान या घटनेने महाबळेश्वरमध्ये भितीचे वातावरण असून संशयित आरोपीच्या शोधासाठी महाबळेश्वर पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. ती संशयिताचा शोध घेत आहेत.

तपास सपोनि सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अब्दुल बिद्री, पोलिस श्रीकांत कांबळे करत आहेत.

Back to top button