सातारा : केबल चोरी करणारी टोळी गजाआड | पुढारी

सातारा : केबल चोरी करणारी टोळी गजाआड

पिंपोडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा :  वाठार स्टेशन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बनवडी व सोळशी गावातील पवनचक्‍की केबल चोरीप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी केवळ कटर खरेदी केल्याच्या पावतीवरून हा तपास केला आहे. संशयितांकडून 4 लाख 41 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. या संशयितांनी पवन चक्क्यांमधील केबल चारी केल्याची कबुली दिली आहे.

प्रशांत गोल्लाप्पा कोळी (रा. सदरबझार, सातारा), किरण सुरेश ठाकूर (रा. चार भिंत परिसर, सातारा), शंकर नंदकुमार कदम (शनिवार पेठ, सातारा) आणि मयूर वाल्मिक शिंदे (रा. केसरकर पेठ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
बनवडी व सोळशी हद्दीत पवनचक्‍की केबल चोरींच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. केबल चोरीसाठी हा गुन्हा करण्यासाठी धारदार कटर, एक्साब्लेड याची पावती चोरीच्या ठिकाणी पोलिसांना आढळून आली. या पावतीवर कोणत्याही दुकानाचे नाव नसतानाही केवळ हस्ताक्षराच्या आधारावर संबंधित दुकानाची माहिती काढली. यानंतर वेगवेगळ्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये संशयितांनी या चोरीसाठी वॅगनर कारचा वापर केल्याचे समोर आले.

यानंतर अधिक चौकशी केली असता संशयितांचे मोबाईल नंबर पोलिसांना मिळाले. मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक विश्‍लेषन करून वाठार पोलिसांनी चार संशयित आरोपींना सातार्‍यातून अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी केबल चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 41 हजार रूपयांची केबलची तार आणि 3 लाखांची कार असा 4 लाख 41 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून अन्य ठिकाणी केलेल्या चोर्‍यांचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

Back to top button