कराड : वाहनांमुळे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांना धोका | पुढारी

कराड : वाहनांमुळे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांना धोका

कराड;  पुढारी वृत्तसेवा :  स्थानिक नागरिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत कानाडोळा केल्यास कशाप्रकारे सार्वजनिक नुकसान होते? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून पोपटभाई पेट्रोल पंप चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांकडे पाहिले जाते. हे कॅमेरे बसवताना चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आल्याने वाहनांचा धक्का लागून एक कॅमेरा तुटला असून वाहनांच्या धक्क्याने कॅमेर्‍यांची दिशाच बदलली आहे.

काही दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाने सिग्नल चौकात होणार्‍या वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळण्यासासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. निश्‍चित पालिकेचे हे पाऊल कौतुकास्पद असेच आहे. मात्र असे असले तरी सिग्नल चौकातील परिस्थिती मात्र याउलट आहे. सिग्नल चौकात अपवाद वगळता वाहन चालकांना थांबण्यासाठी स्टॉप लाईन आखण्यात आलेली नाही. जानेवारी महिन्यात सिग्नल चौकात झेब्रा क्रॉसिंग आखण्यात आले असले तरी ते आखताना संबंधित ठेकेदारांने आपली बुद्धी गहाण ठेवली होती का ? ठेकेदारांच्या मनमानीकडे कानाडोळा करणार्‍या पालिका अधिकार्‍यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? अशी शंका सर्वसामान्य वाहन चालकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.

सिग्नल चौकात स्टॉप लाईन असते का ? झेेब्रा क्रॉसिंग आखताना कोणती काळजी घेतली पाहिजे ? याचे साधे ज्ञानही पालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारास नसावे, याचेच आश्‍चर्य वाटते. एकतर ज्ञान नसावे अन्यथा ज्ञान असूनही कामचुकारपणा व निष्काळजीपणा करण्यात आल्याचेच सिग्नल चौकात पहावयास मिळते. कॅमेरे बसवण्यात आल्याने ते त्वरित कार्यान्वित होणे आवश्यक आहे. मात्र दोन आठवडे होऊनही केवळ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर नियंत्रण ठेवत वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईसाठी आवश्यक साहित्य वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कॅमेरे बसले असले तरी ही यंत्रणा कार्यान्वित केव्हा होणार ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

एकीकडे अशी परिस्थिती असताना पोपटभाई पेट्रोल पंप चौकात सिग्नल यंत्रणा बसवलेल्या खांबास वाहनांच्या उंचीपेक्षा अधिक उंचावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत कमी उंचीवर कॅमेरे बसवण्यात आल्याने आणि कोल्हापूर नाक्याकडून भेदा चौकाकडे वळणार्‍या वाहनांना कॅमेरे थटून एक कॅमेरा तुटला. तर दुसर्‍या कॅमेर्‍याचे तोट पूर्व बाजूला झाले. वास्तविक या ठिकाणी कॅमेरे अधिक उंचीवर बसवणे आवश्यक असून मुख्याधिकार्‍यांनी संबंधितांना सूचना करणे आवश्यक आहे.

केवळ चालकांवर कारवाई का?

सिग्नल चौकात स्टॉप लाईन नसल्याने वाहन चालक आपली वाहने झेेब्रा क्रॉसिंगवर तर कधी झेब्रा क्रॉसिंगपासून पुढे काही अंतरावर थांबवतात. वास्तविक झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवणे चुकीचे आहे. मात्र स्टॉप लाईनच नसल्याने केवळ वाहन चालकांना दोषी मानून कारवाई करणे योग्य आहे का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळेच पालिका प्रशासनाची चूक असताना केवळ चालकांवर कारवाई का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सिग्‍नल चौक मोकळा श्‍वास घेणार का?

  • दोन ते तीन ठिकाणी झाडांमुळे सिग्नलच दिसत नाही
  • सिग्नलवर नो पार्किंगचा नियम केवळ सामान्यांसाठी
  • वडापसह रिक्षाचालकांवर प्रशासनाची मेहेरबानी कायम

कॅमेरे बसवण्याचे काम सुरू असतानाच आपण मुख्याधिकार्‍यांना कळवले होते. त्यानंतरही कॅमेरे कमी उंचीवर लावण्यात आल्याने वाहनांचा धक्का लागतो.
– भास्करराव देवकर,
उपाध्यक्ष, कराड शहर काँग्रेस

Back to top button