सातारा : पवारांचा सातार्‍यातील प्रभाव संपला – मंत्री सोप्रकाश | पुढारी

सातारा : पवारांचा सातार्‍यातील प्रभाव संपला - मंत्री सोप्रकाश

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात मजबूत सरकार आहे. सर्वसामान्य गरीब, शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून प्रभावीपणे योजना राबवण्यात येत आहेत. औद्योगिकीकरणाच्या विकासाच्या द‍ृष्टीने महाराष्ट्रात 3 औद्योगिक केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सातार्‍याचाही समावेश आहे. सातार्‍यात औद्योगिक हब उभारणार, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोप्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, काँग्रेसच नेस्तनाबूत झाली आहे, त्यांचे गड कसे काय राहणार? सातार्‍यातील पवारांचा प्रभावही संपला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजपचा प्रत्येक उमेदवार विजयी होईल, असा दावाही त्यांनी व्यक्‍त केला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रभारी डॉ. अतुल भोसले, धैर्यशील कदम प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील उद्योजकांशी चर्चा करताना त्यांनी एमआयडीसीसंदर्भात काही मागण्या केल्या का, असे विचारले असता मंत्री सोम प्रकाश म्हणाले, उद्योग निर्मितीसाठी पूरक वातावरण निर्माण करणे हेच केंद्र शासनाचे धोरण राहिले आहे. उद्योगांना लागणारी परवानगी व आर्थिक मदतीच्या द‍ृष्टीने केंद्र सरकारने मदतीचे धोरण स्वीकारले आहे. स्टार्टअप योजनेतून 10 हजार कोटी उपलब्ध केले आहेत. नवउद्योजकांना वाव दिला जात आहे. तरुणांनी नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे, असे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. आगामी काळात भारतात 32 मोठी औद्योगिक केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. महाराष्ट्रात 3 केंद्रे सुरू केली जातील. त्यामध्ये सातार्‍याचाही समावेश आहे. या उद्योगांच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होईल, असे सांगितले.

सातारा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप प्रयत्न करणार का? असे विचारले असता मंत्री सोम प्रकाश म्हणाले, सातारा जिल्हा ऐतिहासिक असून छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भूमी आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांचाही हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप प्रयत्नशील आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या द‍ृष्टीने चांगले प्रकल्प राबवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले हे भाजपचे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याबद्दल लोकांच्या भावना जाणून घेतल्या का? त्यांच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहात का? असे विचारले असता मंत्री सोम प्रकाश म्हणाले, सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असून लोकांचे त्यांच्याबाबत चांगले मत आहे. आगामी निवडणुका जिंकण्याच्या द‍ृष्टीने भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रपणे काम करतील, असे त्यांनी सांगितले.

सातारा लोकसभा उमेदवार पार्लमेंटरी बॉडी ठरवणार

सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्‍चित केला आहे का, खा. उदयनराजे यांना संधी दिली जाणार का? असे विचारले असता मंत्री सोम प्रकाश म्हणाले, सध्या सुरू असलेला दौरा पक्ष वाढ व पक्ष बळकटीकरणाच्या द‍ृष्टीने आहे. लोकसभा निवडणुकीला उमेदवार कोण असेल हे पार्लमेंटरी बॉडी ठरवणार आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांचे जिल्ह्यात चांगले काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. काहीही होऊ शकते. सातारा लोकसभा निवडणूक भाजपला जिंकायची आहे. त्याद‍ृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

Back to top button