सातार्‍याजवळ ट्रकवर ट्रक आदळला | पुढारी

सातार्‍याजवळ ट्रकवर ट्रक आदळला

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरालगत बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात बुधवारी रात्री ट्रक दुभाजकावर आदळल्यानंतर पाठीमागून येणार्‍या दुसर्‍या ट्रक चालकाचाही ताबा सुटला व तो ट्रक समोरील ट्रकवर आदळला. ट्रकमध्ये चालक अडकल्याने क्रेनद्वारे त्याला बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून दोन्ही ट्रकचा खुळखुळा झाला आहे.

याबाबत प्राथमिक मिळालेली माहिती अशी, सांगलीहून-पुण्याकडे निघालेल्या ट्रक चालकाचा अचानक ताबा सुटल्यामुळे ट्रक मधोमध असणार्‍या दुभाजकाला धडकला. याचवेळी पाठीमागून येणार्‍या दुसर्‍या चालकाला स्वतःचा ट्रक नियंत्रणात न आल्यामुळे तो ट्रक अपघातग्रस्त ट्रकवर आदळला. अंगावर थरकाप उडवून देणार्‍या अपघातानंतर परिसर हादरुन गेला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक चालक अडकल्याने तत्काळ त्याची माहिती पोलिसांना देवून क्रेन मागवण्यात आली. सुमारे 1 तासाने चालकाला क्रेनद्वारे ट्रकमधून बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्याला सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रकच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

Back to top button