सातारा : गणेशात्सवासाठी सातार्‍यातून कोकणात 115 बसेस | पुढारी

सातारा : गणेशात्सवासाठी सातार्‍यातून कोकणात 115 बसेस

सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारामधून शुक्रवार दि. 26 ऑगस्टपासून गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमन्याच्या दिमतीला सुमारे 115 बसेस धावणार आहेत.

सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा या 11 आगारातील सुमारे 115 बसेस कोकणासाठी देण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. गणेशोत्सव सणाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात येणार्‍या भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वच आगारातून पुणे व मुंबई या ठिकाणी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सातारा आगारातून सातारा-स्वारगेट मार्गावर रोज 46 फेर्‍या होतात. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर 30 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच मुंबई व बोरिवलीसाठी 20 जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. तसेच त्या आगारातून स्वारगेट व मुबंईकडे जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. तसेच सातारा आगारातून मुंबई, ठाणे, पालघर आगाराच्या सुमारे 20 बसेसच्या फेर्‍या मुंबई, ठाणे, व पालघर मार्गावर धावणार आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत ज्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी होईल त्या मार्गावरही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांनी विविध आगारामार्फत सोडण्यात आलेल्या जादा बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

Back to top button