ट्रक उलटून हायवे ब्लॉक : साताराजवळची घटना; चालक जखमी | पुढारी

ट्रक उलटून हायवे ब्लॉक : साताराजवळची घटना; चालक जखमी

सातारा / शेंद्रे : पुढारी वृत्तसेवा

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा शहराजवळ खिंडवाडी येथे मंगळवारी पहाटे लोखंडी साहित्य घेऊन निघालेला बाराचाकी ट्रक मुख्य रस्त्यावरच उलटला. ट्रक हायवेवरच पडल्याने रस्ता ब्लॉक झाला. दरम्यान, शहर ट्रॅफिक पोलिसांनी सुमारे 1 तास शर्थीचे प्रयत्न करून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.

याबाबत अधिक माहिती अशी कर्नाटक राज्यातील ट्रक मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता साताराहून कराडच्या दिशेने निघाला होता. खिंडवाडी येथे आल्यानंतर ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यानंतर सुमारे 100 मीटर ट्रक घसरत पुढे गेला व उलटला. ट्रकमध्ये केवळ चालक एकटाच होता. अपघातामध्ये त्याला सुदैवाने किरकोळ दुखापत झाली. पहाटेची वेळ असल्याने अपघातावेळी पुढे, पाठीमागे कोणतेही वाहन नसल्याने तोही अनर्थ टळला.

अपघातामधून चालकाने सुटका केल्यानंतर मदतीसाठी स्थानिकांची व पोलिसांची मदत घेतली. सातारा शहर ट्रॅफिक पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सपोनि विठ्ठल शेलार, पोलिस हवालदार अनिल धनावडे, सोमनाथ शिंदे, सुभाष कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी करून पान 2 वर

त्यांनी तात्काळ वाहतुक वळवली. अपघातग्रस्त ट्रकमध्ये लोखंडी साहित्य असल्याने व ट्रक बाराचाकी असल्याने ट्रॅफिक पोलिसांनी दोन मोठ्या क्रेन घटनास्थळी पाचारण केले. दरम्यान, अपघाताची माहिती परिसरात पसरल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली.

पोलिसांनी सुमारे 1 तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर गाडी मुख्य रस्त्यावरुन हटवण्यात यश आले. अपघातामध्ये ट्रकचे नुकसान झाले असून रस्त्यावर सांडलेले ऑईल पोलिसांनी पुसून घेतले. रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित झाल्यानंतर एक तासाने तो खुला करण्यात आला. पहाटेची वेळ असल्याने कोणतेही ट्रॅफिक जॅम झाले नव्हते.

Back to top button