सातारा : पालिकेची गणेशोत्सवासाठी सहा पथके | पुढारी

सातारा : पालिकेची गणेशोत्सवासाठी सहा पथके

सातारा; पुढारी वृत्‍तसेवा :  सातारा नगरपालिकेकडून गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी अधिकारी तसेच कर्मचार्‍यांची सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जनासाठी 50 कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सातारा शहर व परिसरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यात येणार असल्यामुळे गणेश मंडळांमध्येही अभूतपूर्व उत्साह दिसून येत आहे. सात-आठ दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारपेठाही सजल्या आहेत. प्रशासकीय पातळीवरही गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. सातारा नगरपालिकेनेही गणेश मंडळांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली आहे. अभिजीत बापट तसेच अतिरिक्‍त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरु आहे. शहरातील गणेश मंडळांसाठी सातारा नगरपालिकेतील अतिक्रमण विभागातून परवाने दिले जात आहेत. बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

शहरात पोहण्याचा तलाव (राजवाडा), बुधवार नाका, हुतात्मा स्मारक, दगडी शाळा (सदरबझार), गोडोली तळे, गोडोलीतील आयुर्वेदिक गार्डनशेजारी विसर्जनिक तळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तळ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच विद्युत विभागाकडून विसर्जन मार्गावरील दिवाबत्‍ती कामांची तपासणी करण्यात येत आहे.

गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी तसेच कर्मचार्‍यांची सहा पथके नियुक्‍त करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये 50 जणांचा समावेश आहे. ही पथके खासकरुन विसर्जन तळ्यावर देखरेख करणार आहेत. गणेश मंडळांसाठी आवश्यक मदत करणार आहेत. या कर्मचार्‍यांच्या नियुक्‍तीचे आदेश अभिजीत बापट यांनी काढले आहेत. गणेशोत्सवाच्यादृष्टीने झालेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्याधिकार्‍यांनी उद्या सर्व विभागांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये राहिलेल्या तयारीच्या अनुषंगाने तयारी करुन उर्वरित बाबींची जबाबदारी निश्‍चित केली जावू शकते.

Back to top button