सातारा; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरप्रकारात राज्य सरकारने 7 हजार 874 जणांना अपात्र ठरवले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 10 शिक्षकांचा समावेश आहे. बोगस टीईटीचे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी या शिक्षकांचे ऑगस्ट महिन्यापासूनच वेतन थांबवण्याचा निर्णय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. या आदेशामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर सातारा जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील शिक्षकांची टीईटी प्रमाणापत्र तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेकडे पाठवण्यात आली होती. त्या प्रमाणपत्रांची पडताळणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्यावतीने करण्यात आली होती.
या तपासणीअंती जिल्ह्यातील 10 शिक्षकांचे टीईटीचे प्रमाणपत्र हे बोगस असल्याचे समोर आले आहे. यावर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचलनालयाने कडक भूमिका घेतली आहे. बोगस प्रमाणपत्र सादर करणार्यांचे वेतन थांबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून या शिक्षकांचे वेतन थांबणार आहे.
यामध्ये माध्यमिक 3, प्राथमिक 5 व नगरपालिकेच्या 2 अशा शिक्षकांचा समावेश आहे. या आदेशावर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग तसेच नगरपालिकेच्या प्रशासन अधिकार्यांनी कार्यवाही सुरू केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. वेतन रोखल्यानंतर या शिक्षकांवर काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे.