सातारा : ‘पुढारी’ने मांडलेल्या प्रश्नांचा प्राधान्याने निपटारा | पुढारी

सातारा : ‘पुढारी’ने मांडलेल्या प्रश्नांचा प्राधान्याने निपटारा

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे सुपुत्र असलेले मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे मायभूमीत दाखल होताच जिल्हावासियांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांचे सादरीकरण दै.‘पुढारी’च्यावतीने करण्यात आले. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे यांनी सातारा जिल्हावासियांच्या असलेल्या अपेक्षा, रखडलेले प्रश्न, जिव्हाळ्याचे विषय याची मांडणी मुख्यमंत्र्यांसमोर केली. यावेळी ना. एकनाथ शिंदे यांनी ‘पुढारी’च्या अंकातील ‘एकनाथ’, सातारा जिल्ह्याचे ‘लोकनाथ’ व्हा, या वृत्ताचे बारकाईने अवलोकन करत ‘पुढारी’ने मांडलेल्या सर्वच प्रश्नांचा प्राधान्याने निपटारा करणार असल्याचे आर्वजुन सांगितले. सातारा जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत अग्रेसर ठेवण्यासाठी ‘पुढारी’ने सोबत रहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे गुरूवारी रात्री त्यांच्या दरे तांब, ता. महाबळेश्वर या मूळ गावी आले होते.वाई मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी ‘पुढारी’ने जिल्ह्याच्या विकासासंदर्भात घेतलेल्या आग्रही भूमिकेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे यांनी जिल्ह्यातील रखडलेले प्रश्न, विकासाचे मुद्दे, लोकांच्या अपेक्षा याबाबत त्यांच्यापुढे विस्तृत मांडणी केली. ‘पुढारी’चा अंकही त्यांना भेट देण्यात आला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून जिल्हावासियांना त्यांच्याविषयी काय अपेक्षा आहेत याबाबतचे अंकही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी ‘एकनाथ’, सातारा जिल्ह्याचे ‘लोकनाथ’ व्हा, या वृत्ताचे बारकाईने अवलोकन केले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘पुढारी’शी माझे जवळचे ऋणानुबंध आहेत. राज्याचा कारभार करताना ‘पुढारी’ने सोबत करावी. ‘पुढारी’ने मांडलेले लोकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. यावेळी आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजुपरे, माजी सभापती संजूबाबा गायकवाड, प्रविण भिलारे, सुभाष कारंडे, संजय मोरे, पत्रकार विठ्ठल हेंद्रे, प्रेषित गांधी, निलेश शिंदे आदी उपस्थित होते.

Back to top button