आ. जयकुमार गोरे यांना जामीन मंजूर | पुढारी

आ. जयकुमार गोरे यांना जामीन मंजूर

सातारा : पुढारी वृत्तसेवा : मायणी, ता. खटाव येथील एकाच्या जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन भाजप आ. जयकुमार गोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आ. जयकुमार गोरे यांनी जामिनासाठी सातारा, मुबंई व दिल्ली येथील न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आधी कोर्टापुढे शरण या मगच जामिनासाठी अर्ज करा असे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी सातारा न्यायालयात अर्ज केल्यानंतर शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, आ. जयकुमार गोरे यांच्यासह एकूण सहाजणांवर मायणी गावातील जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मायणीतील महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरुन दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या तक्रारीनंतर आ. जयकुमार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने गोरे यांना वडूज कोर्टात शरण या आणि त्यानंतर जामिनासाठी अर्ज दाखल करा, असे निर्देश दिले होते.

त्यानंतर काही कालावधीत आ. जयकुमार गोरे यांनी वडूज न्यायालयासमोर हजर राहून नंतर सातारा न्यायालयात मायणी प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. याबाबत शुक्रवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणात गोरे यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणणे मांडल्याने न्यायालयाने मायणी जमिन खोटी कागदपत्रे प्रकरणात आ. गोरे यांना जामीन मंजूर केल्याने आ. गोरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Back to top button