चाफळ परिसरात पाच गावांत 15 घरे फोडली | पुढारी

चाफळ परिसरात पाच गावांत 15 घरे फोडली

चाफळ : पुढारी वृत्तसेवा पाटण तालुक्यातील चाफळ परिसरातील पाच गावांतील 15 घरे चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली. जाळगेवाडी, माथनेवाडी, गमेवाडी, माजगाव येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या घटनेत एकोणीस तोळे सोन्याचे दागिने व लाखो रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. बुधवार, दि. 3 रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटण तालुक्यातील चाफळ परिसरातील जाळगेवाडी खालची व वरची तसेच माथनेवाडी, गमेवाडी, माजगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत तीन घरातील सुमारे एकोणीस तोळे सोन्याचे दागिने व इतर घरातील रोख रक्कम चोरट्यानी चोरून नेली. गुरुवार दि. 4 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जाळगेवाडी येथे चोरट्यांनी कटावणीच्या व एक्सा बेल्डच्या सहाय्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून महादेव भिकू चव्हाण यांच्या घरात प्रवेश केले. घरातील पेटीमध्ये असलेले दोन चैन, दोन बोरमाळ, कानातील दोन सेट असे मिळून सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. महादेव चव्हाण हे बुधवारी रात्री कवठेकरवाडी येथे पाहुण्याकडे मुक्कामी गेले होते. तसेच गमेवाडी येथील मुबारक अब्दुल मुल्ला हे कामानिमित्त परगावी गेले असता त्यांच्या घरातील बारा तोळे सोन्याचे दागिने व दहा हजार पाचशे रुपये चोरट्यांनी चोरून नेले.

तसेच तात्याबा मानकर यांच्या घरातील लहान मुलांचे सोन्याचे दागिने माजगाव येथील शिवाजी किसन पाटील, मोहन कृष्णत देशमुख (पाटील), जाळगेवाडी येथील बाळाराम गणपत साळुंखे, अमोल चंदर साळुंखे, श्रीरंग पांडुरंग साळुंखे, महादेव लक्ष्मन साळुंखे, रामचंद्र लक्ष्मण साळुंखे, कृष्णा शंकर काटे, साहेबराव अंतू शिंदे तर माथनेवाडी येथील आत्माराम नारायण माथने व आनंदा शिवराम माथने, गमेवाडी येथील अमोल बाळकृष्ण देसाई यांच्या घरातील किरकोळ साहित्य व रोख रक्कम चोरीला गेली आहे. चव्हाण, मानकर हे दोघे वगळता बाकी सर्वजण मुबई, पुणे येथे वास्तव्यास असल्याने त्याच्या घरातील नेमकी काय चोरीला गेले आहे हे समजू शकले नाही. पंधरा ठिकाणी झालेल्या चोरीमुळे चाफळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी लावाड, मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि उत्तम भापकर, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, चाफळ पोलिस दूरक्षेत्राचे सिध्दनाथ शेडगे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना सुचना करत चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली.

सहा महिन्यांपूर्वी देखील चाफळ माजगाव येथे दुचाकी व मोबाईल चोरी झाली होती. त्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले होते. जाळगेवाडी, गमेवाडी, माथणेवाडी, माजगाव येथे कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नसल्याने पोलिसांना चोरट्यांचा तपसा करताना अडचणी येत आहेत. चोरीची पध्दत पाहता चोरटे फिरस्थी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्ट्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चोरट्यांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील, असे सपोनि उत्तम भापकर यांनी सांगितले.

अनेक घरमालक पुणे, मुंबईला वास्तव्यास

कटावणीसह एक्सा ब्लेडचा वापर

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

हेही वाचा

Back to top button