पुणे : बांधकामांचा राडारोडा पालिकेच्या रडारवर; अधिकारी करणार बांधकाम ठिकाणांची पाहणी | पुढारी

पुणे : बांधकामांचा राडारोडा पालिकेच्या रडारवर; अधिकारी करणार बांधकाम ठिकाणांची पाहणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील रस्त्याच्या कडेला आणि आडबाजूला रात्रीच्या वेळी टाकल्या जाणार्‍या बांधकामांच्या राडारोड्यावर निर्बंध आणण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. बांधकामांच्या राडारोड्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते, की नाही, याची तपासणी महापालिकेचे अधिकारी बांधकाम ठिकाणांना भेटी देऊन करणार आहेत. महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार
यांनी दिली.

शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे, तसेच दुरुस्तीची कामे सुरू असतात. यामध्ये खासगी विकसकांसोबतच महापालिका आणि शासकीय संस्थांच्या बांधकामांचाही समावेश आहे. या कामांच्या ठिकाणी निर्माण होणार्‍या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने वाघोली परिसरातील खाणींच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच महापालिकेने अवघ्या सव्वादोनशे रुपये प्रतिटननुसार राडारोडा उचलून नेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मात्र, अनेकवेळा रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला, नदीपात्रात, घाटांवर, कालव्याच्या रस्त्यालगत किंवा निर्जनस्थळी राडारोडा टाकला जातो. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरात बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणार्‍या राडारोड्याची कशा पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, याचे ट्रॅकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेचे अधिकारी बांधकाम ठिकानांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. राडारोड्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचे निदर्शसनास आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.

Back to top button