सातारा: सुखेड-बोरीच्या महिलांनी शिव्यांची लाखोली वाहत घातला बोरीचा बार | पुढारी

सातारा: सुखेड-बोरीच्या महिलांनी शिव्यांची लाखोली वाहत घातला बोरीचा बार

लोणंद : शशिकांत जाधव : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी गावातील सुमारे ३०० महिलांनी एकमेकींना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहिली. सुमारे पाऊण तास हा बोरीचा बार चालू होता. गेली अनेक वर्षापासून नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी शिव्यांची लाखोली वाहिली जाते. त्यास बोरीचा बार असे म्हटले जाते. आधुनिक जमान्यात ही परंपरा कायम आहे.

शिव्यांची लाखोली आणि डफडे, शिंग, तुतारीचा निनाद

सुखेड व बोरी या गावातील महिला गेली अनेक वर्षापासून नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारानंतर दोन्ही गावांच्या दरम्यान जाणाऱ्या ओढ्यात येतात आणि एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालतात. दुपारी दोन्ही गावातील सुमारे ३०० महिलांनी एकमेकांना हातवारे करीत शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालण्यास सुरुवात केली. शिव्यांची लाखोली वाहताना डफडे, शिंग, तुतारीचा निनाद करण्यात येत होता. बोरीच्या ओढयात गुडघाभर पाणी होते. बोरीचा बार घालणाऱ्या महिलांना  आवरताना ग्रामस्थ व  पोलीसांची दमछाक झाली. यावर्षी सुमारे पाऊण तास बोरीचा बार भरला.

काय आहे आख्यायिका ?

बोरीच्या बाराबाबत अशी आख्यायिका सांगितले जाते की, बोरीच्या पाटलाला दोन बायका होत्या. एक सुखेड व एक बोरीत राहत होती. दोघी कपडे धुण्यासाठी ओढयात येत असत. एके दिवशी त्यांची भांडणे होऊन ओढयातील पाण्यात मृत्यू पावल्या. तो दिवस नागपंचमीचा दुसरा दिवस होता. त्यावेळी पासून दोन्ही गावातील महिलांचा बोरीचा बार घालण्याची परंपरा सुरू झाला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर  यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button