वाट चुकलेले आजोबा पोलिसांमुळे सुखरूप घरी | पुढारी

वाट चुकलेले आजोबा पोलिसांमुळे सुखरूप घरी

वारजे : पुढारी वृत्तसेवा : रस्ता चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकास उत्तमनगर पोलिसांनी त्यांना त्यांच्या मुलीच्या घरी सुखरूप पोहचविले. याबद्दल पोलिसांच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. अमरावतीहून बाळकृष्ण चिंचोलकर (वय 75) हे उत्तमनगर येथे राहणार्‍या मुलाला व माळवाडीत राहणार्‍या आपल्या मुलीला भेटण्यासाठी आले होते.

उत्तमनगर येथील मुलाच्या घरातून सोमवारी (दि. 1) ते फेरफटका मारण्यासाठी पडले. मात्र, पुन्हा येताना ते घराची वाट चुकले. मुलाच्या घराचा पत्ता शोधत ते थेट उत्तमनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांना त्यांनी मुलाचे घर सापडत नसल्याचे सांगितले. त्यांना वयोमानानुसार पत्ता आठवत नसल्याने त्यांच्या मुलाचा पत्ता न आठवता वारजे माळवाडी येथे राहणार्‍या मुलीचा अर्धवट पत्ता त्यांनी सांगितला.

सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय कांबळे व पोलिस शिपाई सचिन गायकवाड यांनी आजोबांना गाडीत बसवून त्यांच्या मुलीच्या घराचा पत्ता शोधण्यास सुरुवात केली. परंतु, नेमका पत्ता सापडत नसल्याने गायकवाड यांनी स्थानिक माजी नगरसेवक किरण बारटक्के यांच्याशी संपर्क साधला. या वेळी बारटक्के यांनी त्या आजोबांची माहिती घेऊन परिसरातील नागरिकांशी संपर्क साधला. दरम्यान, यशोदीप चौकातील रवी बोबडे यांच्याशी संपर्क साधला असता आजोबांच्या मुलीच्या घराचा पत्ता मिळाला.

Back to top button