सातारा : मालट्रकच्या धडकेत ट्रॅव्हलर बस पलटी | पुढारी

सातारा : मालट्रकच्या धडकेत ट्रॅव्हलर बस पलटी

भुईंज ; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दुपारी भुईंज येथे कोल्हापूरकडे जात असलेल्या ट्रॅव्हलर बसला मागून मालट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रॅव्हलर बस पलटी होवून 6 प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना सातारा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरकडे निघालेली ट्रॅव्हलर बस (क्रमांक एम. एच. 08.ई 9093) मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास भुईंज येथे आली. ही बस कोल्हापूरकडे निघाली असताना प्रवासी घेत घेत जात होती. यासाठी काही काळ महामार्गावर थांबली होती. याचवेळी भरधाव वेगात आलेल्या मालट्रक (क्रमांक एम. एच. 10 ए.डब्ल्यू. 7597) ने बसला पाठिमागून जोरदार जोरदार धडक दिली. या धडकेत ही बस रस्त्यावरच पलटी झाली. या बसमध्ये 17 जण प्रवास करत होते. या अपघातात त्यातील 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना बाहेर काढल्यानंतर तब्बल अर्धा तास रूग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.

अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढत जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनीही वेळेवर येत मदत कार्य राबवले. तसेच वाहतूकही सुरळीत केली. या घटनेची नोंद हवालदार आनंदा भोसले यांनी केली.

Back to top button