कराड : राष्ट्रवादी युवक पाठविणार राज्यपालांना 10 लाख पत्रे | पुढारी

कराड : राष्ट्रवादी युवक पाठविणार राज्यपालांना 10 लाख पत्रे

कराड;  पुढारी वृत्तसेवा :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून महाराष्ट्रासह मराठी माणसाचा अवमान केला आहे. त्यांचा महाराष्ट्र द्वेष सुद्धा अनेकदा दिसून आल्याचा दावा करत त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राज्यभरातून 10 लाख पत्रे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याची सुरुवात कराड तालुक्यातील हजारमाची, ढेबेवाडी, सुपनेसह काले येथील पदाधिकार्‍यांकडून करण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यभर निदर्शने करताना दिसत आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही यात मागे नाहीत.

असे असतानाच आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी राज्यपालांना पत्रे पाठवण्याची सूचना पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदें यांनी माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेस प्रारंभ केला आहे. निखिल शिंदे हे या मोहिमेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दौराही करणार आहेत. मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार 1 ऑगस्टपासून या मोहिमेस प्रारंभ झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातून 1 लाखाच्या आसपास तर पश्‍चिम महाराष्ट्रातून किमान 5 लाखाच्या घरात राज्यपालांना पत्र पाठवण्याचा मनोदय निखिल शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे कराड उत्तर सोशल मिडिया अध्यक्ष बाबासाहेब माने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कराड उत्तर सरचिटणीस सुरज मुल्ला, पाटण तालुका सरचिटणीस ऋषभ डुबल यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व सहकार्‍यांशी व पदाधिकार्‍यांशी निखिल शिंदे हे स्वतः चर्चाही करणार आहेत. राज्यपाल पद घटनात्मक पद आहे. मात्र वादग्रस्त वक्तव्यांसह महाराष्ट्राचा द्वेष अनेकदा दिसून आल्याने राज्यपाल पदाची प्रतिमा मलिन होत आहे. राज्यपालांकडून अनेकदा कर्तव्याची पूर्तता होत नसल्याचेही आरोप होतात.

त्यामुळेच या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्यपालांना कर्तव्याची जाणीव व्हावी, या हेतूने राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राज्यपालांना पत्रे पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राज्यभर ही मोहिम राबवली जाणार आहे.

राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे व मागील अडीच वर्षातील काही घटनांमुळे या पदाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळेच या पदाची प्रतिष्ठा कायम राहण्यासाठी पत्रे पाठवण्याची मोहीम हाती घेली आहे.
– निखिल शिंदे,
प्रदेश सचिव, राष्ट्रवादी युवक

Back to top button