सातारा : राजकीय उलथापालथीने तारळेत उत्सुकता | पुढारी

सातारा : राजकीय उलथापालथीने तारळेत उत्सुकता

तारळे; एकनाथ माळी :  नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद गट व गणाच्या निवडणूक आरक्षणात तारळे जिल्हा परिषद गट, तारळे पंचायत समिती गण व मुरूड पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढणार असून आतापासूनच अनेकांना खुर्चीची स्वप्ने पडू लागली आहेत.

पक्षापेक्षा देसाई-पाटणकर या दोन्ही गटाभोवती फिरणार्‍या राजकारणात शिवसेना (शिंदे गट), मूळची शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप यामध्ये कोण कोणाबरोबर युती करणार का? राजकारणाची खिचडी होणार का? यातून काय उलथापालथी होणार? याकडे विभागातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. तारळे विभाग हा देसाई गटाचा बालेकिल्ला समजला जातो. ग्रामपंचायत व सोसायट्यांमध्ये देसाई गटाचे वर्चस्व आहे. पण पाटणकर गटाने वारंवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देसाई गटाला धक्के दिले आहेत. 2017 साली जिल्हा परिषद गट व तारळे गणासाठी सर्वसाधारण महिला व मुरूड गणासाठी सर्वसाधारण आरक्षण पडले होते. त्यावेळी पाटणकर गटाने तिन्ही ठिकाणी विजय मिळवत देसाई गटाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. दरम्यानच्या काळात तारळे विभागात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या आहेत.

राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर माजी गृह राज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. अशा वेळी तारळे विभागातील बहुतांशी शिवसैनिकांनी आमदार शंभूराज देसाई यांच्याबरोबरच असल्याचे दाखवून दिले आहे. त्यानंतर मुळचे देसाई गटाचे व सध्या भाजपवासी असलेले व प्रत्येक निवडणुकीत देसाई गटाची डोकेदुखी ठरलेल्या नेते मंडळींनी आमदार देसाई यांचे भाजपच्या पदाधिकार्‍यांसोबत स्वतः जावून अभिनंदन केले होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आमदार देसाई हे शिंदे गटात असले तरी विभागातील मूळच्या काही शिवसैनिकांना ही गोष्ट पचनी पडली नाही. पण अशा शिवसैनिकांचे संख्याबळ तुलनेत अत्यंत कमी आहे. या निवडणुकीत आमदार शंभूराज देसाई आणि भाजप हे एकत्र येण्याची शक्यता आहे.

तर महाविकास आघाडी पटर्न या निवडणुकीत जुळला तर पाटणकर गट (राष्ट्रवादी काँग्रेस) मूळचे निष्ठावंत म्हणवले जाणारे शिवसैनिक व काँग्रेस एकत्र येऊन आमदार शंभूराज देसाई गटापुढे आव्हान निर्माण करू शकतात. तिन्ही ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने यंदा जुन्या इच्छुकांबरोबर आता नवीन इच्छुकांनीही आपली ताकद आजमावण्याचे ठरवल्याचे पहावयास मिळत आहे.

सर्वसाधारण आरक्षणामुळे प्रस्थापित आमदार देसाई व सत्यजितसिंह पाटणकर या दोन्ही गटात इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सलग दोन निवडणुकीत सर्वसाधारण आरक्षण पडल्याने पुढील निवडणुकीवेळी आरक्षण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटातील अनेकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी ‘अभी नही तो कभी नही’ या उक्तीप्रमाणे कामाला सुरूवात केली आहे. त्यामुळेच आमदार देसाई यांच्यासह सत्यजितसिंह पाटणकर गटातील इच्छुकांची नाराजी दूर करत आपआपला गट एकत्रित ठेवण्याचे मोठे आव्हान या गटाच्या नेत्यांपुढे असणार आहे. तसेच या निवडणुकीत आमदार शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विधानसभा अन् जिल्हा परिषदेत वेगळे चित्र
ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुकीत वर्चस्व राखणार्‍या आमदार शंभूराज देसाई समर्थकांना तारळे विभागातील मतदारांनी जिल्हा परिषद – पंचायत समितीवेळी धक्काच दिल्याच इतिहास सांगतो. मात्र असे असले तरी विधानसभा निवडणुकीत आमदार शंभूराज देसाई गटाला झुकते माप मतदार देतात, असे मागील दोन विधानसभा निवडणुकीत पहावयास मिळाले आहे.

Back to top button