बामणोली; पुढारी वृत्तसेवा : जागतिक वारसा स्थळ असणार्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होण्यास अद्याप अवधी असून फुलांचे गालिचे तयार होण्यासही अद्याप प्रारंभ झाला नसला तरी कास पठार कार्यकारी समिती व सातारा वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कास पठार परिसरातील पावसाळी पर्यटनाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.
जावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रंजनसिंह परदेशी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी कास पठार कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत, माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर आखाडे, गोविंद बादापुरे, सोमनाथ बुढळे, राजाराम जाधव, वनरक्षक स्नेहल शिंगाडे यांच्यासह समितीचे आजी-माजी पदाधिकारी व समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
कास पठार म्हणजे निसर्गाचा अदभुत खजिना. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य, दुर्मिळ वनस्पती यामुळे कास पठार जागतिक पर्यटन स्थळ बनले. दुर्मिळ फुलांबरोबरच कास पठारावर अनेक पॉईंटस असून ते दुर्लक्षित आहेत. त्यामध्ये मंडपघळ, प्राचिन गुहा, कुमुदिनी तलाव, लाकडी मनोर्यावरून दिसणारे कास तलावाचे रूप, सज्जनगड पॉईंट, नैसर्गिक तलाव, छोटे छोटे धबधबे इ. निसर्गाची अदभुत किमया पाहण्याची संधी निसर्गप्रेमी पर्यटकांना आता मिळणार आहे. याकरिता प्रतिव्यक्ती 30 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहेे. फुलांच्या हंगामामध्ये ज्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश शुल्क घेऊन सोडले जाते तेथे मात्र या कालावधीमध्ये प्रवेश बंद असणार आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी हंगाम कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेली कास परिसर दर्शन सेवा साधारणपणे आठ दिवसानंतर सुरु होईल, असे समजते.
पर्यटकांना हे पॉईंट पाहण्यासाठी तिकिट विक्रीसही सोमवारी सुरुवात झाली. सुमारे 100 पर्यटकांनी कास पठार परिसरातील विविध पॉईंटना भेट दिली.
निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता येणार
कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम ऐन बहरात येण्यास अद्याप बराच कालावधी आहे. त्यामुळे सध्या फुलांचे सडे दिसणार नसले तरी पठारावरील निसर्गसौंदर्याचा पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येणार आहे. पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे 850 पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार या पठारावर आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे. तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या 32 प्रजाती आढळतात. हंगाम बहरल्यानंतर वेगवेगळी फुले, वनस्पतींबरोबरच पर्यटकांसाठी छोटे-मोठे झरे, धबधबे याचा खरा आनंद लुटता येणार आहे.