फलटणमध्ये चायनीज मांजाची चलती | पुढारी

फलटणमध्ये चायनीज मांजाची चलती

फलटण ; पुढारी वृत्तसेवा : फलटणच्या बाजारपेठेत चायनीज मांजाची चलती सुरू आहे. शासनाने यावर बंदी आणल्यानंतरही मागणीनुसार अवघ्या 20 रुपयांपासून ते 2 हजारांपर्यंत या मांजाची उघड-उघड विक्री सुरू आहे. हा मांजा धोकादायक असून, पक्षी जखमी होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे याची विक्री करणार्‍या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींमधून होत आहे.

माणसापासून पक्षापर्यंत जीवघेण्या ठरलेल्या मांज्यावर बंदी असतानाही सर्रासपणे याची विक्री व वापर सुरू आहे. हा मांजा पतंग उडवण्यासाठी कमी आणि एखाद्याला जखमी करण्यासाठी वापरला जातो की? काय असा प्रश्न पडतो आहे. अलीकडे पतंग उडवण्याच्या नादात धोकादायक मांजा वापरण्याचे फॅड आले आहे. सध्या शहर आणि परिसरात पतंग उडवणे सुरू आहे. यासाठी काहीजण न तुटणार्‍या चायनीज नायलॉनचा मांजा सर्रास वापरतात.

मांजाबरोबरच प्लास्टिकचे पतंगदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे प्रशासन नेमके कुठे आहे? असा सवाल नागरिकांना पडला आहे.

पतंग उडवण्याचा खेळ होतो. हाच मांज एखाद्याचे कुटुंब उध्दवस्त करू शकतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हा मांजा नायलॉनपासून बनवल्यामुळे याच्यात वार्‍याचा दाब आणि ताण सहन करण्याची सर्वाधिक क्षमता असते. हा मांजा सहजासहजी तुटत नाही. हाताने ओढूनही तोडण्याचा प्रयत्न केल्यास जखम होते. हा चायनीज मांजा पक्षांसह माणसाच्याही जीवावर बेतू लागला आहे. यावर धडक कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिस विभागांनी याविषयी कारवाई करून अनूचित प्रकार थांबवावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

मांजाबंदी केवळ कागदावरच

* फलटण शहर व तालुक्यात चायनीज मांज्यामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पक्षांसाठी चायनीज मांजा हा मृत्यूचा सापळा ठरत असल्याने सरकारने त्याच्या वापरासह विक्रीवर बंदी आणली होती. मात्र, फलटण शहरासह व ग्रामीण परिसरात नियमाला धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे. चायनीज मांज्यावर बंदी केवळ कागदावरच का ? असा सवाल केला जात आहे.

प्लास्टिक पतंगावरही नाही नियंत्रण

* बंदी असलेला मांजाच नाही, तर बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पतंगाचीदेखील बाजारपेठेत चलती आहे. या प्लास्टिकपासून बनवलेले पतंग बाजारपेठेत सर्वत्र उपलब्ध आहेत. एकीकडे प्लास्टिक बंदी घालून नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू असताना व्यापाराच्या नावाखाली प्लास्टिक पतंग उपलब्ध आहेत.

Back to top button