सातारा : कोयना जुलैअखेर अपेक्षित पाऊस नाही | पुढारी

सातारा : कोयना जुलैअखेर अपेक्षित पाऊस नाही

पाटण ; गणेशचंद्र पिसाळ : गतवर्षी जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात कोयना धरणासह पाटण तालुक्यात नैसर्गिक हाहाकार माजला होता. कमी काळात सर्वाधिक पावसाचे शंभर वर्षातील विक्रम मोडीत निघाले आणि कधीही भरून येणार नाही अशी मोठ्या प्रमाणावर जीवित व अब्जावधींची वैयक्तिक, सार्वत्रिक वित्तहानी झाली. यावर्षी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस पडला. मात्र दुसर्‍या पंधरवड्यात पावसाने अनपेक्षित दडी मारली. गतवर्षीच्या तुलनेत धरणांतर्गत विभागात आत्तापर्यंत सरासरी एक हजार मिलिमीटर कमी पाऊस झाला असून 37.07 टीएमसी पाण्याची कमी आवक झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 40 टीएमसी पाण्याची गरज आहे.

गतवर्षी कोयना धरणांतर्गत विभागात पावसाने यापुर्वीचे अनेक विक्रम मोडीत काढले. नैसर्गिक आपत्तींमध्ये महापूर, भूस्खलनात अभूतपूर्व अशी जीवित व वित्तहानी झाली. वर्षभरात राज्यातील वीजटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोयनेतून अतिरिक्त पाणीवापर झाला.

अखंडित वीजनिर्मितीसाठी कमालीचा पाणीवापर झाल्याने चालू वर्षारंभाला अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला. यावर्षी अपुर्‍या पावसामुळे जून महिन्याच्या तीस दिवसात धरणात केवळ एक टीएमसी इतकीच पाणी आवक झाली. जुलैच्या पहिल्याच पंधरवड्यात धरणात 35.47 टीएमसी पाण्याची आवक झाली. परंतु दुसर्‍या पंधरवड्यात पुन्हा पावसाने दडी मारल्याने सरासरी पाण्याची आवक कमी झाली.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 67.50 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी आरक्षित आहे. वर्षभरात पूर्वेकडे सिंचनासाठी सरासरी 30 ते 35 टीएमसी पाण्याची गरज भासते. चालू वर्षी आतापर्यंत तुलनात्मक कमी पाऊस झाला आहे, धरणात जुलै अखेरच्या तुलनेत काहीसा कमी पाणीसाठा असल्याने धरणातून धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून पूर्वेकडे सोडण्यात येणारे पाणीही आता बंद करण्यात आले आहे.

मात्र गतवर्षीच्या अनुभव लक्षात घेता ऑक्टोबर महिन्यापर्यंत येथे पाऊस पडत होता व धरणातून सातत्याने पाणी सोडले जात होते. त्यामुळे त्याचा विचार केला तर अद्यापही पावसाचे तब्बल दोन ते अडीच महिने शिल्लक असल्याने या दरम्यानच्या काळात होणार्‍या पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अपेक्षित 49 टीएमसी पाणी आवक या काळात सहज शक्य असून यावर्षीही हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा अभ्यासकांचा दावा आहे .

Back to top button