सातारा : ढगफुटीने अक्रित : गटारी अमावस्‍येच्या रात्री कवठेत गटारगंगा; १५० घरांत घुसले पाणी | पुढारी

सातारा : ढगफुटीने अक्रित : गटारी अमावस्‍येच्या रात्री कवठेत गटारगंगा; १५० घरांत घुसले पाणी

कवठे : पुढारी वृत्तसेवा : कवठे (ता. वाई) येथे दोन दिवस ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. महामार्ग प्राधिकरणाच्या गलथानपणाने अंडरपास खाली मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने गावाचा इतर गावांशी रात्रभर संपर्क तुटला होता. या पावसामुळे तसेच गावाच्या प्रवेशद्वार कमानीजवळ व अंडरपासखाली 10 ते 12 फूट उंचीपर्यंत पाणी साठले. यामुळे लेंडी ओढ्याचा मूळ प्रवाह सोडून मुख्य रस्त्यावरून गावातील 150 घरांमध्ये गटारी अमावस्येच्या रात्री गटारगंगा पोहोचली. या घटनेनंतर शुक्रवारी तहसीलदारांनी घटनास्थळाची पाहणी केली.

दोन दिवस झालेल्या ढगफुटीसद़ृश पावसाने वाई तालुक्यातील कवठे, सुरूर, वहागाव, केंजळ, वेळे, चवणेश्वर, शिरगाव परिसरात हाहाकार उडाला. पावसामुळे शेतातील बांध फुटून पिकांचे अतोनात नुकसान झाले.

कवठे परिसरात बुधवारी दुपारी पावसाने थैमान घातले. त्याचबरोबर चवणेश्वर डोंगररांगा, शिरगाव परिसरातसुद्धा प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळल्याने पाणी शेतीत घुसून ताली व बांध फोडले. वेळे ते जोशी विहीर येथे महामार्गावरील सेवारस्त्यांच्या बोगद्यात पाण्याचे तलाव निर्माण झाले. शिवाजी विद्यालय सुरूर, सुरूर अंडरपास. कवठे अंडरपास, वेळे अंडरपास या सर्व ठिकाणच्या भुयारी बोगद्यातून प्रचंड प्रमाणात पाणी साठले होते. कवठे व सुरूर विद्यालय परिसरातील बोगद्यात 7 फुट पाणी साठल्याने या ठिकाणची वाहतूक बंद झाली.

कवठेच्या पूर्वेस असणार्‍या वाघजाईनगर, मोरेवस्ती, खुडेवस्ती व कुंभारआळी या वस्तीतील सर्वच घरांमध्ये 4 ते 5 फूट पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. रात्रीच्या अंधारातच घरांमध्ये पाणी आल्याने नागरिक रस्त्यावर आले व एकच कल्लोळ माजला. पाण्याबरोबर साप, विंचू, खेकडे, मासे आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

या घटनेची माहिती मिळताच रात्री 10.30 च्या दरम्यान तहसिलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी नारायण घोलप, विस्तार अधिकारी बाबर, मंडलाधिकारी नरेंद्र गायकवाड यांनी कवठे गावाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणाविषयी असलेला रोष व्यक्त केला. यावेळी तहसिलदारांनी नुकसानग्रस्त घरे, मालमत्ता, शेतीची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तलाठी सुशील राठोड व ग्रामसेवक राजेंद्र भोसले यांना केल्या.

ग्रामस्थांचा महामार्ग रोखण्याचा इशारा

कवठेमध्ये ढगफुटीने थैमान घातले असून यात महामार्गावरील पाणी पुलाखाली साठून राहत आहे. या पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजना न केल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी तहसीलदारांनी प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

सेवारस्ता बोगद्यातील पाण्यामुळे प्रवासी अडकले

कवठे गाव अंडरपास परिसरात 7 फुटांपर्यंत साठलेले पाणी रात्री दोनच्या सुमारास कमी झाल्यावर सकाळी या ठिकाणावरून लोकांची ये-जा सुरू झाली. तोपर्यंत सुरूरमार्गे मुख्य महामार्गावरून विरुद्ध दिशेने प्रवास करत जीव धोक्यात घालून बरेच प्रवाशी गावामध्ये आले. तरुणाईने जीव धोक्यात घालून महामार्गावरून प्रवाशांना गावात आणण्यास मदत केली. त्याचवेळी नेतेमंडळींच्या विरोधात सोशल मीडियावर नेटकर्‍यांनी झोड उठवली.

Back to top button