सातारा : कास पठारावरील पॉईंट १ ऑगस्टला सुरू होणार | पुढारी

सातारा : कास पठारावरील पॉईंट १ ऑगस्टला सुरू होणार

बामणोली; पुढारी वृत्तसेवा : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील हंगाम साधारण ऑगस्टअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. तर, कास पठारावर पावसाळी पर्यटन हंगाम 1 ऑगस्टपासून सुरू होत असून त्यासाठी 30 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

सातारा वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मेढ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी परदेशी, समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

कास पठार म्हणजे निसर्गाचा अद्भूत खजिना. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य, दुर्मीळ वनस्पती यामुळे कास पठार जागतिक पर्यटन स्थळ बनले. दुर्मीळ फुलांबरोबरच कास पठारावर अनेक पॉईंटस् असून ते दुर्लक्षित आहेत. त्यामध्ये मंडपघळ, प्राचिन गुहा, कुमुदिनी तलाव, लाकडी मनोर्‍यावरून दिसणारे कास तलावाचे रूप, सज्जनगड पॉईंट, नैसर्गिक तलाव, छोटे-छोटे धबधबे इ. निसर्गाची अद्भूत किमया पाहण्याची संधी निसर्गप्रेमी पर्यटकांना मिळणार आहे.

फुलांच्या हंगामामध्ये ज्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश शुल्क घेऊन सोडले जाते तेथे मात्र या कालावधीमध्ये प्रवेश बंद असणार आहे. गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेली कास परिसर दर्शन सेवा यावर्षी सुरू करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही परिसर दर्शन सफारी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. कास परिसर दर्शन सेवेमध्ये जवळजवळ 50 किलोमीटरचा प्रवास असून त्यासाठी दोन वाहने आहेत. यासाठी 4 हजार रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार असून या वाहनामध्ये आठ पर्यटकांना बसण्याची संधी देण्यात येणार आहे. ही कास परिसर दर्शन बस सेवा कास पठार ते घाटाई, देवराई, वांजुळवाडीमार्गे कास तलाव, तांबी येथून वजराई धबधब्याकडे जाईल.

धबधब्याचे मनमोहक रुप पाहिल्यानंतर परत अंधारी, सह्याद्रीनगरच्या पवनचक्क्या त्यानंतर वेण्णा नदीचं विहंगम द़ृश्य, एकीव धबधबानंतर अटाळीच्या नवरा नवरी डोंगराला भेट व परत कास पठार दिशेने ही सेवा सुरू राहणार आहे. लवकरच ही सेवा पर्यटकांसाठी खुली होईल, असे समितीमार्फत यावेळी सांगण्यात आले. 1 ऑगस्टपासून वरील पॉईंटवर प्रवेश दिला जाईल. पार्किंग व्यवस्था कास पठारावर करण्यात आलेली आहे.

Back to top button