World Women's Equality Day : रणरागिणी मी, कर्तव्यपूर्तीशी जोडले आता नाते | पुढारी

World Women's Equality Day : रणरागिणी मी, कर्तव्यपूर्तीशी जोडले आता नाते

सातारा : विठ्ठल हेंद्रे

‘पंतप्रधान योजना लोन’ या फसव्या मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटचा अलीगड येथे पर्दाफाश करत मुंबई सायबर क्राईमने आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या. टोळीचा म्होरक्या राजकीय कार्यकर्ता असल्याने संभाव्य तणावाची परिस्थिती असतानाही हे प्रकरण कौशल्याने हाताळून सहाय्यक पोलिस निरीक्षक अलका काळभोर-जाधव यांचे पोलिस दलात सर्वत्र कौतुक होत आहे. World Women’s Equality Day

कुटुंबामध्ये आजोबा, वडील व सासू असा तिघांचे मृत्यू झाले असतानाही ते दु:ख बाजूला ठेवून अलका काळभोर यांनी ‘घेतली भरारी, दु:ख बाजूला केले आता; रणरागिणी मी, कर्तव्यपूर्तीशी नाते जोडले आता’ हा बाणा दाखवून दिला. त्यामुळेच त्यांचे कार्य इतरांपेक्षा थोडे वेगळे म्हणावे लागेल. आजच्या जागतिक महिला समानता (World Women’s Equality Day) दिवशी त्याची दखल घ्यावीच लागेल. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन ‘पोलिस महासंचालक’ व ‘केंद्रीय गृहमंत्री पदकानेफ त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या सर्व तपासासाठी त्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मसूद, पोलिस हवालदार अभिजीत देसाई, प्रवीण सुरवसे, सपकाळे यांची मदत झाली.

ज्यासाठी अलका काळभोर यांना गौरवले गेले त्या गुन्ह्याचा तपास साधा, सरळ, सोपा नव्हता. मात्र, त्यांनी कौशल्याने तपास तडीस नेला. देशाच्या पंतप्रधानांचे नाव तसेच अशोक स्तंभ वापरुन बोगस अ‍ॅप, वेबसाईटवरुन फसवणूक होत असल्याबाबत मुंबई सायबर पोलिस ठाण्यात दि. 2 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल झाला. यानंतर अवघ्या 18 दिवसांमध्ये या गुन्ह्याचे समूळ उच्चाटन करण्यात पोलिसांना यश आले.

यासाठी सायबरची दोन पथके तैनात होती. संजीव कुमार हा मुख्य संशयित आरोपी असल्याने त्याला पकडण्यासाठी अलका काळभोर या सहकारी पोलिसांसोबत 12 दिवस अलीगड येथे तळ ठोकून होत्या. प्रत्यक्ष कारवाईवेळी मुंबई पोलिस तेथे पोहचल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. मात्र तो राजकीय कार्यकर्ता असल्याने त्याच्या समर्थनार्थ सुमारे 500 जणांचा मॉब जमला होता. यामुळे स्थानिक पोलिसही कचरले. मात्र मुंबई पोलिसांनी कौशल्यपूर्ण रितीने हे प्रकरण हाताळले. आणि संशयिताला ताब्यात घेतले.

दरम्यान, अवघ्या 18 दिवसांमध्ये मुंबई सायबर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. तपासामध्ये देशातील 4 हजार नागरिकांची 5 कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्याचे समोर आले. यामुळे तक्रारदारांचा ओघ सुरु राहिला. पोलिसांनी कारवाईत 18 मोबाईल, 10 हार्डडिस्क, 3 राऊटर, 1 पेनड्राईव्ह जप्त केला.

रेमडेसिवीर, फ्रँक अश्लीलचे रॅकेटही ओपन

दीड वर्षापासून कोरोना कालावधीत रेमडेसिविर या इंजेक्शनच्या माध्यमातून फसवणूक करणार्‍या टोळ्याने व्हॉट्सअप, फेसबुक व ट्विटरवर नंबर व्हायरल केले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक अलका काळभोर-जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचे रॅकेटही मे 2021 मध्ये उद्ध्वस्त केले आहे. ही टोळी बिहार राज्यातील निघाली असून संशयितांनी 32 बँक खाती काढून प्राथमिक माहितीनुसार अवघ्या 2 महिन्यात 40 लाख रुपयांची माया उकळली आहे.

यातील संशयित देखील उच्च शिक्षित असून तांत्रिक तपासही त्यांना पकडणार नाही या अविर्भावात ते होते. मात्र मुंबई सायबर क्राईमने ‘डोक्यानेफ तपास करत सलग चार रात्र जागून संशयितांना अटक केली. दरम्यान, एकीकडे पंतप्रधान लोन योजनेचा तपास सुरु असताना मुंबई सायबरचा अश्लील प्रँक (व्हिडीओ शुटींग करत एखाद्याला उल्लू बनवणे) बनवणार्‍या टोळीचाही पर्दाफाश करुन दिल्ली, मुंबई, ठाणे येथून टोळी अटक केली.

Back to top button