झेडपी, पंंचायत समितीसाठी आज आरक्षण | पुढारी

झेडपी, पंंचायत समितीसाठी आज आरक्षण

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण बहाल केल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेसाठी गुरुवार, दि. 28 रोजी पुन्हा आरक्षण सोडत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 73 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सकाळी 11 वाजता ही सोडत होणार आहे. जिल्हाधिकारी स्वत: ही सोडत काढणार आहेत, तर पंचायत समिती गणांसाठी तालुक्याच्या ठिकाणी सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षणामध्ये कुठे ओबीसींचे आरक्षण होणार, याबाबत उत्सुकता असून सोडतीनंतरच राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

राज्य सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले आहे. सातार्‍यासाठी ओबीसींचा कोटा हा 26.4 टक्के इतका राहणार आहे. लोकसंख्या वाढल्याने यंदा जिल्हा परिषदेचे 9 गट वाढले आहे. तर गणांमध्ये 18 ची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे आता 73 गट व पंचायत समित्यांचे 146 गण झाले आहेत. यापूर्वी ओबीसी आरक्षणाशिवाय सोडत होणार होती. परंतु, त्याला निवडणूक आयोगाने स्थगिती आणली. आता सर्वच प्रवर्गांचे आरक्षण होणार आहे. या आरक्षण सोडतीत काय होणार? याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यादृष्टीने अनेकांनी तयारीही सुरू केली आहे.

जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात 3 गट व 6 गण, फलटण 9 गट व 18 गण, माण 5 गट व 10 गण, खटाव 8 गट व 16 गण, कोरेगाव 6 गट व 12 गण, वाई 5 गट व 10 गण, महाबळेश्‍वर 2 गट व 4 गण, जावली 3 गट व 6 गण, सातारा 10 गट व 20 गण, पाटण 8 गट व 16 गण, कराड 14 गट व 28 गण अशी रचना राहणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात गट व गणांची पुनर्रचना करण्यात आली आहे. जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या 24 लाख 59 हजार 20 इतकी आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषानुसार ही आरक्षण सोडत होणार आहे. त्यानुसार सुरूवातीलाच अनुसूचित जाती व जमाती प्रवर्ग आरक्षीत केले जाणार आहेत. जिल्ह्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही 22 हजार 413 आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाचा टक्का 0. 6 ने घसरला आहे. ओबीसींना 26.4 टक्के आरक्षण मिळणार आहे.त्यानुसार ओबीसी समाजाला 19 जागा तर खुल्या गटाला 45, अनूसूचित जातीला 8 व अनुसूचित जमातीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे.

या आरक्षण सोडतीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून हे आरक्षण आपल्या सोयीचे पडावे, यासाठी इच्छूकांनी देव पाण्यात घातले आहेत. या इच्छुकांची अवस्था ‘गणा धाव रे .. गटा पाव रे’ अशी झाली आहे.

Back to top button