निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची नौटंकी : आ. शिवेंद्रराजे

निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची नौटंकी : आ. शिवेंद्रराजे
Published on
Updated on

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : कास धरणाचे काम पूर्ण होवूनही वाढीव पाईपलाईनचा पत्ता नाही. त्यामुळे सातारकरांना वाढीव पाणी फक्‍त पहावेच लागणार आहे. याला पालिकेचा नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. आता पालिकेची निवडणूक जवळ आल्याने उदयनराजे दिल्‍लीत निवेदने देवून फोटोसेशन करण्याची नौटंकी करत असल्याची टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली. दरम्यान, विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस संपले असून सातारकरांना जाब देण्याची वेळ आली असल्याचेही शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे.

आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, गेले पाच- सहा वर्ष पालिकेत मनमानी, नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. पालिकेचा आणि सातारकरांचा पैसा लुटण्याचा एककलमी कार्यक्रम पालिकेत सुरु होता. आता निवडणूक आली की, मंजूर नसलेल्या, न होणार्‍या आणि दुसर्‍याने केलेल्या कामांचे नारळ फोडायचे, मुंबई, दिल्लीवारी करून मंत्र्यांच्या भेटी घेवून निवेदन द्यायचे आणि फोटोसेशन करून सातारकरांना भुलवायचे हे प्रकार जोमाने सुरु झाले आहेत.

सत्तारूढ आघाडीत नगरसेवकांच्या टेंडर, कमिशन आणि टक्केवारीसाठी लागणार्‍या कळवंडी सातारकरांना उघड्या डोळ्याने पहायला लागल्या. डीडीटी पावडरच नव्हे तर कचर्‍यातही पैसे खाण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. भ्रष्टाचारमुक्त कारभार असा डांगोरा पिटून आणि सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष असा दिखावा करून सातारकरांना भावनिक करून पालिकेची सत्ता मिळवली आणि पालिकेचा अक्षरश: बाजार करून टाकला, असा आरोपही शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला.

कुठे आहे सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष? असा सवाल सातारकर करत असल्याचे नमूद करून आ. शिवेंद्रराजे यांनी पुढे म्हटले आहे की, हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागाच्या मुलभूत सुविधांसाठी 40 कोटी मंजूर केले पण पैसे खायला मिळावेत म्हणून आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला हे काम मिळावे यासाठी याची टेंडर प्रक्रिया रखडवून शहराच्या विकासाला खीळ घालण्याचे काम सुरू आहे.

पालिकेला लुटून खाणारे आता निवडणूक आली की फोटोसेशन करून विकासाची खोटी स्वप्ने रंगवत आहेत. जेव्हा निधीअभावी कासचे काम थांबले तेव्हाच वाढीव पाईपलाईनसाठीचा प्रस्ताव सादर व्हायला हवा होता. पण त्यावेळी यांना कशाचेच काहीही देणेघेणे नव्हते. त्यावेळी हे आणि प्रशासन झोपा काढत होते, असेही आ. शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे.

ज्यात पैसे आहेत त्यातच यांना इंटरेस्ट असतो हे सातारकरांना कळून चुकले आहे. पाईपलाईनचे काम मंजूर व्हायला वर्ष लागणार, त्यानंतर काम सुरु होणार आणि पूर्ण कधी होणार? तोपर्यंत सातारकरांना कासचे पाणी फक्त बघतच बसावे लागणार आहे. पाणीसाठा वाढल्यानंतरही सातारकरांना वाढीव पाणी मात्र मिळणार नाही हे पाप तुम्ही केले. तुमच्या पापाचा घडा भरला असून सातारकर तुम्हाला चांगला धडा शिकवतील, असा टोलाही लगावला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news