म्हसवड ; पुढारी वृत्तसेवा : माण तालुक्याला मंजूर असलेली एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा या सरकारचा डाव आहे. सरकार कोणाचे ही असो, माणच्या विकासामध्ये कोणी आडवे येत असेल तर सामान्य नागरिकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा शिवसेना नेते शेखर गोरे यांनी दिला आहे.
म्हसवड येथील एमआयडीसीला स्थगिती देऊन कोरेगाव भागातच ती उभारण्याचा फलटण, कोरेगाव येथील लोकप्रतिनिधींनी घाट घातला आहे. म्हसवड ऐवजी कोरेगाव येथेच एमआयडीसी उभारण्याबाबत मुंबई येथे संबंधित कार्यालयात वरिष्ठस्तर अधिकार्यांची बैठक बुधवारी होणार होती. मात्र, याबाबतची संभाव्य अडचण लक्षात घेऊन बुधवारची बैठक रद्द करून ती गुरुवारी घेण्यात येणार आहे.
गेली कित्येक वर्षे माण तालुक्याचा विकास खुंटला आहे. माण तालुक्यातील मंजूर एमआयडीसी कोरेगाव तालुक्यात नेण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक होणार असल्याचे समल्यानंतर शिवसेना नेते शेखर गोरे आक्रमक झाले आहेत. माण तालुक्यातील एमआयडीसी कोरेगावला नेल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शेखर गोरे म्हणाले, कित्येक वर्षे सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधी माण तालुक्यात एमआयडीसी यावी यासाठी प्रयत्न करत आहेत. मंजूर एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा या सरकारचा डाव आहे. सरकार कोणाचे ही असो, माणच्या विकासांमध्ये कोण आडवे येत असेल तर सामान्य नागरिकांना बरोबर घेऊन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.