पाचगणी नगरपरिषद : पाचगणीत इच्छुकांची धाकधूक वाढली

पाचगणी नगरपरिषद : पाचगणीत इच्छुकांची धाकधूक वाढली
Published on
Updated on

पाचगणी ; मुकुंद शिंदे : पाचगणी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गाच्या गुरूवारी होणार्‍या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर पाच जागांवर ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पडणार असल्याने या प्रवर्गातील उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रभागात कुठले आरक्षण पडणार? थेट नगराध्यक्षपदाचे आरक्षण कधी जाहीर होणार? खुल्या प्रवर्गातून कोणाचा पत्ता कट होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आरक्षण सोडतीमुळे इच्छुकांची धाकधुक वाढली आहे.

आरक्षण सोडतींमुळे सध्या जगप्रसिध्द पर्यटनस्थळावरील वातावरण तापले आहे. आता 2011 च्या लोकसंख्येनुसार नवीन रचनेत 10 प्रभाग करण्यात आले असून त्यातून 20 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. या बदलामुळे दोन प्रभागात तीन नगरसेवक वाढले आहेत.
आरक्षण सोडतीत प्रभाग 3(अ) आणि प्रभाग 9 (अ) या दोन ठिकाणी अनु. जाती सर्वसाधारण तर प्रभाग 2(अ) व प्रभाग 8 (अ) हा अनु. जाती महिलांकरिता राखीव आहे.

आता सर्वसाधारण महिलांचे आरक्षण रद्द करून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारणसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पाचगणीमधील ओबीसी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. ओबीसी आरक्षण नक्की कोणत्या प्रभागात पडणार हे चित्र आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे.

ओबीसी आरक्षणामुळे कुणाचे पत्ते कट होणार व कुणाला नगरसेवक पदाची लॉटरी लागू शकते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ओबीसी आरक्षणामुळे अनेक आजी-माजी नगरसेवकांसह अनेक नवखे तरुण यानिमित्ताने राजकारणात येण्याच्या तयारीत आहेत. अनेक तरुण समाजकार्यात सहभागी होऊन जनतेसमोर येत आहेत.

पाचगणीतील राजकारण गेल्या पाच वर्षात आरोप प्रत्यारोपांनी गाजले.कधी सत्तारूढ आघाडीकडे अधिक बलाबल तर कधी 'आधे इधर आधे उधर'. सत्तेच्या या खेळात अनेक समस्यांना शहरवासीयांना सामोरे जावे लागले. त्यामुळे यावेळी जनता विचार करूनच मतदान करेल, असे चित्र दिसून येत आहे.

आता 10 प्रभागात 20 नगरसेवक असणार आहेत. पाचगणी पालिकेच्या इतिहासात पक्षांच्या चिन्हांवर निवडणूका कधीही लढवल्या गेल्या नाहीत. अपक्षांच्या माध्यमातून पण, नंतर विजयी उमेदवारांची मोट बांधून सत्ता स्थापन केली जाते.

माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी तीन वेळा नगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचा राजकारणातील असलेला गाढा अभ्यास सर्वांनाच चकवणारा असतो. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचा करिष्मा चांगला असल्याने ते काय भूमिका घेतात? याकडेही जनतेचे लक्ष आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news