सातारा : ठेकेदारांना नगरसेवक पदाची स्वप्ने | पुढारी

सातारा : ठेकेदारांना नगरसेवक पदाची स्वप्ने

कराड ; चंद्रजित पाटील : नगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आतापासून काही इच्छुकांनी संभाव्य मतदारांना प्रलोभने दाखवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. आकाड्यांना जोर आला असतानाच काहीजण कुंड्या, तर काहीजण घरोघरी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेऊ लागले आहेत. यात काही उपरे इच्छुकही आघाडीवर असून उपर्‍या इच्छुकांकडून प्रभागातील समस्या, प्रश्नांना कितपत न्याय मिळणार? याबाबत नागरिकांमध्ये तर्कविर्तक सुरू झाले आहेत.

कराड नगरपालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत यापूर्वीच झाली आहे. यात पालिकेच्या 31 जागापैकी 4 जागांवर यापूर्वीच आरक्षण पडले आहे. तर उर्वरित 27 जागांवर महिलांसह खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मार्ग रिकामा झाला आहे. त्यामुळेच आता उर्वरित 27 जागांपैकी आठ जागा ओबीसी समाजासाठी आरक्षित होणार आहेत. याशिवाय ज्या 4 प्रभागांतील प्रत्येकी एक जागा आरक्षित झाली आहे, त्या प्रभागातील दुसर्‍या जागेवरील पूर्वीचेच आरक्षण कायम राहणार आहे.

त्यामुळेच सध्यस्थितीत ओबीसी आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना काही इच्छुकांनी निवडणूक नक्की केव्हा जाहीर होणार? याबाबत संभ्रमावस्था असतानाच सर्वसामान्य नागरिकांना आतापासून प्रलोभने, आमिषे दाखवण्यास दाखवण्यास सुरुवात केली आहे. काहीजण कुंड्या वाटत आहेत. तर काहीजण सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रभागातील नागरिकांच्या कधी थेट घरी जाऊन तर कधी बागेत, फिरावयास गेल्यानंतर मुद्दाम भेट घेऊन चर्चा करत असल्याचे दिसते.

वास्तविक यापूर्वीही काही प्रभागात अन्य प्रभागात वास्तव्यास असणार्‍या उमेदवारांना कराडकरांनी सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली होती. मात्र, एखादा दुसरा अपवाद वगळता बहुतांश ‘उपर्‍या’ नगरसेवकांचे अनुभव फारसे चांगले नाहीत. निवडणुकीपुरते पैसे अथवा भेट वस्तू, जेवण मिळाले म्हणून सर्वसामान्य नागरिकांकडून अनेकदा चांगल्या उमेदवारांना डावलले जाते आणि पुढे पाच वर्ष खराब कामे, नगरसेवक फिरकतच नाही, अशी ओरड करण्याची वेळ नागरिकांवर येते.

त्यामुळेच या निवडणुकीत पैशाच्या जोरावर काहीही शक्य आहे, अशा ‘अविर्भावात’ असणार्‍या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते म्हणवणार्‍या उपर्‍यांना कराडकर किती संधी देणार ? याचे उत्तर निवडणूक निकालानंतरच मिळणार आहे. मात्र असे असले तरी कराडात अनेक ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी अक्षरशः पायघड्या घातल्या जात असल्याचे पहावयास मिळत आहे.

सत्तेतून कामे, कामातून पैसे अन् पुन्हा …

काही नगरसेवक अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या शहरातील रस्ते अथवा अन्य कामात हितसंबंध गुंतलेले असतात आणि अशा प्रवृत्तीमुळे विकासकामांचे वाटोळे होते. कराडकर नागरिक यांची खंगमपणे चर्चाही करतात, मात्र परिस्थिती बदलत नाही. त्यामुळेच सत्तेतून कामे मिळवायची…कामातून पैसा मिळवायचा आणि पुढे त्याच पैशातून पुन्हा सत्ता मिळावयाची हे समीकरणच रूढ झाल्याचे अनेकदा पाहावयास मिळते. आदर्श लोकशाहीसाठी हे घातक असल्याने कराडकर नागरिक अशा प्रवृत्तीला घरात बसवणार की
सभागृहात? यावरच विकासकामांचा दर्जा, गुणवत्ता अवलंबून असणार आहे.

यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात…

यंदा पालिका निवडणुका आणि गणेशोत्सव एकत्रच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सवातील खर्चाबाबत फारशी काळजी करावी लागणार नाही. 2016 साली गणरायाच्या आगमनालाही कराडकरांसाठी इच्छुकांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यंदा आत्तापासून प्रलोभने, आमिषे आणि जेणावळ्या झडू लागल्याने गणेशोत्सवावेळी काय परिस्थिती असणार ? याबाबत वेगळे सांगण्याची गरजच नाही.

Back to top button