लबाड लांडगं ढ्वाँग करतंय… : उदयनराजे भोसले | पुढारी

लबाड लांडगं ढ्वाँग करतंय... : उदयनराजे भोसले

सातारा : पुढारी वृत्तसेवा : झोपडपट्टीसदृश वसाहतीमधील हातावरची पोटं असणार्‍यांच्या जीवावर उठणार्‍यांच्या तोंडी कायापालट करण्याची भाषा पाहून त्यांचे हे प्रेम खरे प्रेम नसून हा ढोंगीपणा असल्याचे दिसून येते. त्यांचे हे नवीन ढोंग माजगांवकर माळावरीलच काय सातार्‍यातील सर्वच झोपडपट्टीसदृश वसाहतीमधील नागरिकांनी ओळखले आहे. ‘लबाड लांडगं ढ्वाँग करतंय…आता स्वाँग करतंय’, अशा शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता आ. शिवेंद्रराजे यांच्यावर टीका केली.

सोंग आणि ढोंग करायला फार थोडं डोकं लागतं, असे नमूद करुन खा. उदयनराजेंनी पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरातील माजगावकरमाळ, लक्ष्मीटेकडी, भीमाबाई आंबेडकरनगर, 440 सदरबझार, रामाचा गोट, राजलक्ष्मी पिछाडी, अशा सर्व ठिकाणी हातावरचं पोट असणारी आणि बहुतांशी मजूर-कष्टकरी असणारी सर्वसामान्य जनता राहते. आज ज्यांनी काही ढोंग केले आहे. त्यांची सत्ता असताना माजगावकर माळ येथील झोपड्या उठवण्याबाबत नगरपरिषदेत ठराव केला होता. बुलडोझर आणि मशिनरी आणून येथील लोकांना देशोधडीला लावायचे पूर्ण नियोजन केले होते. केवळ आम्ही ठामपणे आडवे पडल्यानेच येथील झोपड्या शाबूत राहिल्याचे खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.

पोलिस लाईनच्या पाठीमागील पंताचा गोट भागातील झोपड्यांची वस्ती पोलिस बंदोबस्तात आणि बळाचा वापर करुन नगरपरिषदेमार्फत हटवण्यात आली होती. झोपडपट्टीसदृश वसाहतीमध्ये रहात असले तरी ती सर्व माणसे आहेत. त्यांच्याही भावना आहेत. हीच माणुसकीची प्रामाणिक भूमिका घेवून माजगावकर माळासह भिमाबाई आंबेडकर झापडपट्टी, रामाचा गोट आदी ठिकाणी आम्ही पंतप्रधान आवास योजना, घरकुलयोजनेंतर्गंत किमान मूलभूत सुविधांसह हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून केली आहे. हे काम आता टप्प्यात आले आहे.

कोणतीही झोपडी हटवण्याला आम्ही कधीही कारणीभूत राहिलेलो नाही. माजगावकर माळ येथे पीएमआय योजनेअंतर्गत शाहूपुरी पोलिस स्टेशन ते आकाशवाणी अखेर रस्ता डांबरीकरणाकरिता सुमारे 75 लाख आणि आकाशवाणी ते महानुभव पंथाचा मठ अखेर रस्त्यासाठी सुमारे रुपये 75 लाखांच्या डांबरीकरण कामाकरता सातारा नगरपरिषदेत मंजुरी देण्यात आलेली आहे. याकामांमध्ये करंजे इन्डस्ट्रीयल इस्टेटच्या अंतर्गंत रस्त्यांच्या डांबरीकरणाचाही समावेश असल्याचेही खा. उदयनराजेंनी नमूद केले आहे.

Back to top button