लक्ष्मण मानेंच्या प्रवेशामुळे वंचितांना न्याय मिळेल : आ. जयंत पाटील | पुढारी

लक्ष्मण मानेंच्या प्रवेशामुळे वंचितांना न्याय मिळेल : आ. जयंत पाटील

सातारा : पुढारी वृत्तसेवा : उपरकार माजी आमदार लक्ष्मण मानेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे वंचितांना न्याय मिळेल. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळेल हा विश्वास आहे. माने यांनी स्वार्थ नसलेल्यांची नावे द्यावी त्यांना पक्ष वेगळी जबाबदारी देवून महाराष्ट्रात काम करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, आ. राजेश टोपे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, माने यांनी भटक्या विमुक्तांसाठी चांगले काम केले आहे. हे काम ते गत 30 ते 40 वर्षांपासून करत आहेत. समाजामध्ये न्यायापासून अनेक जण वंचित आहेत. अशा लक्ष्मण माने यांच्यासारख्यांची गरज आहे. पवारांच्या आग्रहाखातर अल्पसंख्याक व सामाजिक न्याय ही दोन खाती आम्ही मागून घेतली होती. ती याच शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी. 2003 मध्ये मानेंच्या सांगण्यावरून अनेक तरतूदी केल्या होत्या. असा अर्थसंकल्प पुन्हा कधी झाला नाही, असेही ते म्हणाले.

लक्ष्मण माने म्हणाले, जे संविधान मानत नाहीत ते आमचे शत्रू असून त्यांच्याविरोधातील असंतोष संघटित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरएसएसला पराभूत करण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. जोपर्यंत शरद पवार आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू. दलितांमध्ये एकत्रित येण्यासाठी संघटना नाही, याचा फायदा आरएसएसने घेतला आहे. राज्यघटना, न्याय व्यवस्था, लोकशाही आरएसएस मानत नाही. मग, या संघटनेला दहशतवादी म्हणून का घोषित केले जात नाही? असा सवाल त्यांनी केला.

Back to top button