सातारा जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट | पुढारी

सातारा जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, पाटण, कराड, खंडाळा, फलटण यासह अन्य तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रूग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नसून वेळीच अशा डॉक्टरांचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य व्यवस्थीत रहावे, त्यांना आरोग्याची योग्य सेवा मिळावी यासाठी शासनाने ग्रामीण भागासह शहरी भागात जिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रे सुरू केली. परंतु अपुर्‍या सोयी सुविधा व कर्मचार्‍यांच्या अभावामुळे ग्रामीण जनतेला जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावांमध्ये खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेत आहेत. त्यामुळे ही संधी पाहून बोगस डॉक्टरांनी ग्रामीण भागातील गावोगावी आपले बस्तान बसवून ग्रामीण भागातील जनतेची आर्थिक लूट करून जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सध्या सुरू केला आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्यानेच बोगस डॉक्टरांचा खुलेआम गोरखधंदा सुरू आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही परवानगी अथवा पदवी नसताना थातूरमातूर घेतलेल्या वैद्यकीय सेवेच्या भरवशावर ग्रामीण भागात बोगस डॉक्टराकडून रूग्णांवर कोणतीही औषधे देवून त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या डॉक्टरामुळे रूग्णाचे आरोग्यच धोक्यात आले आहे. चुकीच्या उपचारपध्दतीमुळे एखादा रूग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेने वेळीच अशा डॉक्टरांचा शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्यकता आहे.

बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीने सातारा जिल्ह्यात आतापर्यंत किती बोगस डॉक्टर शोधून कारवाया केल्या हे पाहणेही तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्हास्तरीय समित्यांच्या आतापर्यंत किती बैठका झाल्या? बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी काय प्रयत्न केले? बोगस डॉक्टरमुक्त जिल्हा करण्यासाठी आरोग्य विभागाकडून काय पावले उचलली गेली, असे विविध प्रश्न पुढे आले आहेत.

सर्वच तालुक्यात बोगसगिरीचे पेव…

जिल्ह्यातील कोरेगाव, पाटण, कराड, खंडाळा, माण, खटाव यासह अन्य तालुक्यांमध्ये बोगस डॉक्टरांचे पेवच फुटले आहे. या डॉक्टरांकडे आरोग्य विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने ते नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांवर आरोग्य विभागाकडून कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिकांंना पडला आहे.

Back to top button