सातारा जिल्ह्यात ऊस क्षेत्रात 15 हजार हेक्टरची वाढ

File Photo
File Photo

सातारा : महेंद्र खंदारे :  जिल्ह्यात गतवर्षी सुमारे 40 ते 45 हजार हेक्टरवर उसाचे उत्पादन झाले होते. मात्र, मुबलक पावसामुळे यंदा जिल्ह्यातील उसाचे उत्पादन वाढणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात 10 ते 15 हजार हेक्टरने वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात 40 ते 45 लाख मेट्रीक टन अतिरिक्‍त उसाचे गाळप कारखान्यांना करावे लागणार आहे. दरम्यान, याबाबतचा आढावा साखर आयुक्‍त कार्यालयाकडून घेण्यात आला आहे.

यंदाच्या गळीत हंगामात सातारा जिल्ह्यात अतिरिक्‍त उसाचे उत्पादन झाले. तोड न मिळाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. यंदाच्याही वर्षी अतिरिक्‍त उसाचे उत्पादन झाल्याने मागच्या वर्षीचीच पुनरावृत्ती होते की काय? असा सवाल केला जात आहे.
गतवर्षी साखर आयुक्‍त कार्यालयाला इतक्या मोठया प्रमाणात उसाचे उत्पादन होईल, याचा अंदाज आला नाही. त्यामुळे नियोजनाचा फज्जा उडाला. कारखानानिहाय गाळप करता आले नाही. अनेकांनी आयुक्‍तांचे आदेशच न मानता बॉयलर बंद केले. त्यामुळे गाळपाचे तीन तेरा वाजले. यंदाही मोठया प्रमाणात उसाचे उत्पादन होणार आहे. त्यासाठी आयुक्‍त कार्यालयाने शेतकर्‍यांना उसाची नोंद करणे, कारखान्यांना सक्‍तीने नोंद करून घेणे, तोडणीसाठी करार लवकर करून घेणे, गाळप क्षमतेनुसार उसाची विभागणी करणे याचे नियोजन केले जात आहे.
सातारा जिल्ह्यात गत हंगामात सुमारे 40 ते 45 हजार हेक्टरवर उसाचे उत्पादन घेतले होते. यंदा त्यामध्ये 10 ते 15 हजार हेक्टरची वाढ होवून ते 55 ते 60 हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे. एकरी 40 टन उसाचे उत्पादन गृहीत धरल्यास हंगामात 40 ते 45 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप कारखान्यांना करावे लागणार आहे.

किसनवीर, खंडाळ्यामुळे गाळपाचा प्रश्‍न मिटणार
भुईंज येथील किसनवीर कारखान्यात सत्तांतर होवून कारखाना आ. मकरंद पाटील यांच्या ताब्यात आला आहे. त्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. शेअर गोळा करणे व वाहतूक तोडणी करार करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात खंडाळा आणि किसनवीर कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा, जावली, वाई, खंडाळा आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. दोन्ही कारखान्यांची गाळप क्षमता जास्त असल्याने उस तोडीसाठी हात पसरावे लागणार नाही, अशी परिस्थिती आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news