सातारा : नगरपालिकांच्या निवडणुका स्थगित | पुढारी

सातारा : नगरपालिकांच्या निवडणुका स्थगित

सातारा;  पुढारी वृत्‍तसेवा :  जिल्ह्यातील फलटण, कराड, वाई, रहिमतपूर तसेच म्हसवड या नगरपालिकांच्या जाहीर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाला राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी स्थगिती दिली. संबंधित नगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू राहणार नाही. या निवडणुकांचा कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै रोजी ‘ब’ वर्ग असलेली फलटण आणि कराड तसेच ‘क’ वर्ग असलेली वाई, रहिमतपूर आणि म्हसवड या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार दि. 22 जुलैपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार होती. तर 18 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार होते. पावसाळी प्रदेशाचा विचार करून आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जारी करून आचारसंहिताही लागू केली होती. पावसाळा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने या निवडणुका स्थगित कराव्यात, अशी मागणी होत होती.

सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दि. 12 रोजी दाखल झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायालयाने यासंदर्भात दि. 19 रोजी सुनावणी ठेवली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने जिल्ह्यातील पाचही नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम स्थगित केला आहे. या निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे संबंधित नगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू राहणार नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. या नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याझाल्या पाचही शहरांमध्ये राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला होता. अनेक इच्छुक निवडणूक आखाड्यात उतरण्याच्या तयारीत होते. मात्र तूर्त या निवडणुकांना ब्रेक लागल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला.

दरम्यान, नगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या पाच प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या संबंधित मुख्याधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र निवडणुका स्थगित झाल्यामुळे प्रशासनाच्या या तयारीलाही विराम मिळाला आहे.

Back to top button