भविष्य निर्वाहची स्लिप पाहिजे.. ‘द्या 300 रुपये’ | पुढारी

भविष्य निर्वाहची स्लिप पाहिजे.. ‘द्या 300 रुपये’

सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन विभागात सर्व काही अलबेल सुरु असल्याचा भास आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची स्लिप पाहिजे असल्यास त्यासाठी 300 रुपयांची आकारणी केली जात असल्याचा आरोप होत आहे. एखादा जवळचा शिक्षक असल्यास त्यांच्याकडून 250 रुपये उकळले जात असल्याची चर्चा आहे. हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. पैसे उकळणार्‍या कर्मचार्‍यांना वेळीच लगाम घालणे गरजेचे आहे. याची कल्पना वरिष्ठ अधिकार्‍यांना असूनसुध्दा त्याकडे डोळेझाक केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन विभाग हा महत्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. या विभागातूनच शिक्षकांना दर महिन्याला वेतन यासह अन्य बिले काढली जात असतात. मात्र, या विभागात सर्व काही अलबेल सुरू आहे. वेतन विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी विविध कामांमध्ये चांगलाच उच्छाद मांडला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या नावलौकिकाला बट्टा लागत आहे. जिल्ह्यातील विविध शाळा व विद्यालयांचे शिक्षक या विभागात दररोज कामानिमित्त येत असतात. मात्र, शिक्षकांना आपल्या कामासाठी पैसे टाकल्याशिवाय कोणतेही काम मार्गी लागत नाही, असेच चित्र पहावयास मिळत आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचारी शासनाचा गलेलठ्ठ पगार घेत असले तरी त्यांना पैशाची हाव काय कमी होताना दिसत नाही. त्यामुळे हम करे सो कायदा, असा प्रकारच वेतन विभागात पहावयास मिळत आहे.

भविष्य निर्वाह निधीच्या स्लिपा या विभागातूनच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दिल्या जातात. मात्र, वर्ष निहाय स्लिपांना पैसे आकारण्याचा नवा फंडाच या ठिकाणी सुरू आहे. एका वर्षाच्या स्लिपसाठी 300 रुपये आकारले जात असल्याचा आरोप होत आहे. मात्र, कर्मचार्‍यांचा जवळचा एखादा शिक्षक असल्यास त्यांच्याकडून 250 रुपयांची आकारणी होत असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना गेल्या 2 ते 3 वर्षांच्या भविष्य निर्वाह निधीच्या स्लिपा या विभागाकडून मिळाल्या नसल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणीचे फरक बिल काढण्यासाठी बिलाच्या रकमेनुसार पैशाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही ते सांगतील तेवढे पैसे देत आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास फंडाची बिले काढण्यासाठी 3 ते 5 हजार रुपयांपर्यंत पैशाची मागणी केली जाते. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची वैद्यकीय बिले काढण्यासाठी बिलांच्या रकमेनुसार पैसे मागितले जातात. त्यामुळे या वेतन विभागात खुलेआम पैशाचा गोरख धंदा सुरू झाला आहे.

अनेकदा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना आपली कामे करण्यासाठी रजा काढूनच वेतन विभागात हेलपाटे मारावे लागतात त्यासाठी वेतन विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना शिक्षकांची आर्थिक नस सापडली असल्याने त्याचा पुरेपूर फायदा ते घेताना दिसत आहेत. त्यामुळे या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना न्याय कोणाकडे मागावयाचा असा प्रश्‍न पडला आहे. वेतन विभागात कोणतेही काम पैेसे टाकल्याशिवाय होत नाही. पैसे दिले नाहीत तर प्रस्तावांमध्ये वारंवार त्रुटी काढून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना घायकुतीला आणले जाते. या विभागातील सर्व कारनामे वरिष्ठांना माहीत असले तरी डोळेझाक केली जात आहे.

दररोज नवीन बकरा शोधण्यातच कर्मचारी व्यस्त

अनेकदा वेतन विभागात एखादा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कामानिमित्त कार्यालयात आल्यास त्याच्याशी उध्दट बोलून तुम्ही कशाला आला क्‍लार्क पाठवायचे नाही का? असा सवाल करून त्यांना परत माघारी पाठवले जाते. तसेच एखादा शिक्षक व क्‍लार्क वेतन विभागातील कर्मचार्‍यांना चला चहाला जावू असे म्हटले की? संंबंधित कर्मचारी बरोबर कार्यालयातील सर्व लवाजमा घेऊन चहाला जात आहेत. यावेळी हा सर्व लवाजमा नाष्ट्यावर येथेच्छ ताव मारून चहाचा मनमुराद आनंद घेत आहे. त्यावेळी त्या शिक्षकाच्या खिशाला मात्र हजार दिडहजार रुपयाला फोडणी बसत आहे. किरकोळ कामांसाठी शिक्षकांना झेडपीत आल्यानंतर वेतन विभागातील कर्मचार्‍यांची उठाठेव करावी लागत आहे. त्यामुळे हे कर्मचारी दररोज नवीन बकर्‍याच्या शोधात असतात. दिवसातून 3 ते 4 वेळा वेतन विभागातील अधिकारी व कर्मचारी चहाच्या नावाखाली जिल्हा परिषद परिसरामधील हॉटेलमध्ये पाहूणचार घेत असल्याचे चित्र वेळोवेळी पहावयास मिळत आहे.

हेही वाचा

Back to top button