सातारा : सर्वत्र रेड अलर्ट मात्र खटावला नो अलर्ट! | पुढारी

सातारा : सर्वत्र रेड अलर्ट मात्र खटावला नो अलर्ट!

खटाव; अविनाश कदम : जुलै महिन्यात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह सर्वत्र दमदार पाऊस कोसळत आहे. कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुष्काळी खटाव तालुक्यात मात्र अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तालुक्यातील सर्वच पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे.

खटाव तालुक्यात जून महिन्यात सरासरी 94 मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र फक्त 58 मिमी म्हणजेच 61 टक्केच पाऊस झाल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. त्याचाच परिणाम म्हणून शेतकर्‍यांना खरीपाच्या पेरण्या करता आल्या नाहीत. जुलै महिन्यात सर्वत्र दमदार पाऊस पडेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे राज्यात आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाने सुरुवात केली आहे. मात्र खटाव तालुक्यावर वरुणराजा अद्यापही रुसलेलाच आहे. मे महिन्यात दर वर्षी मोठ्या प्रमाणावर येणारा अवकाळी पाऊसही यंदा खटाव तालुक्यात बरसला नव्हता. शेतकर्‍यांना पेरणीपूर्व मशागतीही करता आल्या नव्हत्या. जून महिन्याच्या शेवटी खटाव मंडलातील काही गावांमध्ये दोन पाऊस झाले होते. इतर मंडलात आजिबातच पाऊस झाला नसल्याने जुलैचा पहिला आठवडा संपला तरी पेरण्या झाल्या नाहीत. एक दोन पाऊस झालेल्या फक्त 12 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

नेर धरणात 26 टक्के, दरुज तलावात 15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येळीव, पारगाव, सातेवाडी, डांभेवाडी शिरसवडी, कानकात्रेवाडी या तलावांमध्ये कसलाच पाणीसाठा नाही. मायणी तलावात टेंभूचे पाणी आल्याने सध्या 42 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. येरळवाडी मध्यम प्रकल्पात फक्त 18 टक्के पाणी आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून येरळा नदी एकदाही वाहीली नसल्याने नदीकाठच्या गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

Back to top button