कुडाळ;पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथील घनसोलीतील एका निवासी संकुल पुनर्बांधणी संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली होती. त्याला आम्ही केवळ पाठिंबा व्यक्त केला आहे. हा विषय राजकीय नसून ती आमची राजकारणाची भूमिका नव्हती. मी माझी राजकीय भूमिका कधीही बदललेली नाही अन् बदलण्याचाही माझा विचार नाही, काहींनी माझ्या भेटीचा चुकीचा अर्थ काढून अफवा उठवली आहे, असे स्पष्टीकरण माथाडी कामगार नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ (दादा) शिंदे यांनी दिले आहे.
सौरभ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याची अफवा पसरल्यानंतर त्यांना उलटसुलट विचारणा सुरु झाली. याबाबत आपले स्पष्टीकरण देण्यासाठी 'पुढारी'शी बोलताना सौरभ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथील घनसोलीतील एका निवासी संकुल पुनर्बांधणी संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली होती. या निर्णयामुळे तेथील रहिवासी हे मुख्यमंत्री यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मीही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा व्यक्त केला.
संबंधित निर्णयाबाबत आम्ही मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा दिल्या. परंतु याचा अर्थ काहींनी चुकीचा काढला. मी माझी राजकीय भूमिका कधीही बदललेली नाही. अन् बदलण्याचाही माझा विचार नाही. मी फक्त मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी घणसोलीतील पुनर्बांधणी धोरणाबाबत सकारात्मक घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले असल्याचे सौरभ शिंदे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.