सातारा : वारीतील चोरट्यांची पोलिसांकडून बारी | पुढारी

सातारा : वारीतील चोरट्यांची पोलिसांकडून बारी

सातारा : विठ्ठल हेंद्रे

दोन वर्षांनंतर पायी पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात आल्याने जिल्हा पोलिस दलाकडून चोख उपाययोजना करण्यात आल्या. पालखीचे जिल्ह्यात विक्रमी मुक्‍काम असताना पोलिसांनी आषाढी वारीतील चोरट्यांची बारी काढत त्यांच्यावर अंकुश ठेवला. तब्बल 54 जणांवर विविध प्रतिबंधात्मक कारवाई केल्या असून त्यामध्ये महिलाही असल्याचे समोर आले.

दि. 28 जून ते 4 जुलै अशी आठवडाभर संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यात मुक्‍कामाला होती. पालखी पुणे जिल्ह्यातून आल्यानंतर सातारा जिल्ह्यात मनोभावे स्वागत होत पुढे सोलापूर जिल्ह्यात गेली. लोणंद, तरडगाव, बरड व फलटण या सर्व पालखी मार्गावर सातारा पोलिस 24 तास कर्तव्य बजावण्यासाठी होते. पालखीवेळी भक्‍तांना चोरट्यांचा फटका बसू नये, यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. वारकरी वेेशातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) तसेच स्थानिक पोलिस यांची चोरट्यांवर करडी नजर होती. एलसीबी, फलटण शहर व फलटण तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये पुरुष चोरटे 41 तर महिला चोर 13 सापडल्या आहेत.

चोरटे पकडण्यासाठी पोलिस वारकरी वेशांमध्ये असतात. त्याद्वारे संशयास्पद हालचाली करणार्‍यांवर थेट वॉच राहतो. तसेच जे वारकरी झोपलेले असतात, आराम घेतात अशा ठिकाणी पोलिस थांबतात. यावेळी अधिक प्रमाणात चोरी होत असल्याने रेड हॅन्ड चोरटे सापडण्यास मदत होते. तसेच साध्या वेशात पोलिस असल्याने वारीमध्ये कुठे काही गडबड झाली तरी लगेच त्यांना समजते.

सीआरपीसीच्या 4 प्रतिबंधात्मक कारवाया…

आषाढी वारीमध्ये चोरीच्या उद्देशाने येणार्‍या चोरट्यांचा उच्छाद असतो. या संशयितांचे रेकॉर्ड रहावे, यासाठी नवे चोरटे व जुने चोरटे अशी त्याची विभागणी केली जाते. सीआरपीसी 109 प्रमाणे चोरीच्या उद्देशाने संशयास्पद सापडल्यास त्यावर कारवाई करणे. 151 (1) प्रमाणे म्हणजे चोरी केलेल्या संशयितास 24 तास पोलिस ताब्यात ठेवतात. 151 (3) प्रमाणे म्हणजे संशयित चोरट्याला पुढील किमान 3 ते 5 दिवस जेलमध्ये टाकणे. सीआरपीसी 149 प्रमाणे कारवाई म्हणजे चोरी केलेल्या संशयिताला नोटीस देवून सोडणे होय.

हौशे, गवशे, नवशे…

आषाढी वारीमध्ये महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील वारकरी मंडळी येतात. हौशे, गवशे व नवशे असे समीकरण वारीत पहायला मिळते. अशावेळीही पोलिस वेगवेगळ्या आयडिया करुन चोरट्यांना पकडतात. यासाठी पुरुष पोलिस व महिला पोलिस स्वत: वारकर्‍यांचे वेश घेतात. पोलिसांचा थेट वारकर्‍यांशी संपर्क येत असल्याने त्यांची कारवाईची कामे हलकी होतात.

Back to top button