सातारा : पाटणमधील आपत्तीग्रस्त गावांवर धोक्याची टांगती तलवार | पुढारी

सातारा : पाटणमधील आपत्तीग्रस्त गावांवर धोक्याची टांगती तलवार

पाटण ; गणेशचंद्र पिसाळ : पाटण तालुक्याला भलेही आपत्ती नवी नसली तरी गतवर्षीच्या भूस्खलनात अभूतपूर्व अशी जीवित व कधीही भरून न येणारी वैयक्तिक, सार्वजनिक हानी झाली. सह्याद्रीसह बहुतांशी स्थानिक डोंगर दुभंगल्याने व दरडग्रस्तकड्यांच्या खालच्या गावांच्या धोक्यांसह अतिवृष्टी, महापुराची कायमची टांगती तलवार डोक्यावर आहे. आजही अनेक गावांतील शेकडो कुटुंबांना आपला जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.

जूनमध्ये अत्यल्प पाऊस तर आता जुलैमध्ये पावसाचा जोर वाढत आहे. गतवर्षी जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यातील निसर्गाचे रौद्र रूप तालुक्यासाठी विनाशकारी ठरल्याने आता पुन्हा तशी परिस्थिती नको म्हणून भलेही प्रार्थना, उपाययोजना सुरू असल्या तरी देखील याबाबत वैयक्तिक व सार्वत्रिक खबरदारी घेतली तरच गतवर्षीच्या त्या काळ्या आठवणी गाढण्यात यश येईल. भूकंप , अतिवृष्टी, महापूर या नैसर्गिक आपत्ती पाटण तालुक्याच्या पाचवीला पूजलेल्या आहेतच. गतवर्षी कमी काळात सर्वाधिक पाऊस झाला, अगदी शंभर वर्षांचे विक्रम या पावसाने मोडीत काढले. निसर्गाने हे विक्रम मोडीत काढताना तालुक्याचे सार्वत्रिक कंबरडेही मोडले, बहुतांशी विभागात मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक सार्वत्रिक अशी अभूतपूर्व हानी झाली. आंबेघर तर्फ मरळी, ढोकाींवळे, मिरगाव अशा काही गावात मातीच्या ढिगार्‍याखाली अनेक कुटुंबाच्या कुटुंबं गाडली गेल्याने त्यांची कधीही भरून न निघणारी हानी झाली. गावच्या गावं उद्ध्वस्त झाली शिवाय बहुतांशी ठिकाणी नदी,ओढ्या, नाल्याच्या आजूबाजूच्या शेतीत मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्याने त्या ठिकाणची शेती पिकांसोबतच शेतजमिनीही वाहून गेल्या.

मूळच्या शेतात मोठ्या प्रमाणावर दगड, गोटे आल्याने वर्षभरात त्या शेतीतून निघणार्‍या उत्पन्नापेक्षाही हे दगड, गोटे काढण्यासाठीचा खर्च अधिक असल्याने संबंधित शेतकर्‍यांनी आता शेती करणेच सोडून दिले आहे. अनेक सार्वजनिक रस्ते, पूल, फरशा, साकव, स्मशानभूमी, नळ पाणीपुरवठा योजना, शाळा यादेखील यामध्ये उद्ध्वस्त झाल्या. अनेकांची घरे, शेत जमिनी, पिकांचे नुकसान झाले तर त्याहीपेक्षा कितीतरी पटीने सार्वजनिक व्यवस्था उद्ध्वस्त झाली. या नुकसानीला भरपाई म्हणून शासनाची आलेली तोकडी मदत लक्षात घेता अक्षरशः आभाळाला ठिगळं घातल्याचेच पाहायला मिळाले. गतवर्षी भूस्खलनाचा पहिलाच अनुभव असल्याने निश्चितच वैयक्तिक, सार्वजनिक, शासकीय, सामाजिक संस्थांकडून अपेक्षित मदत मिळाली या मदतीचा लाभ खर्‍या अर्थाने मूळ लाभार्थ्यांना किती मिळाला व नको त्या मंडळींनी यावरही हात मारला या बाबीही सर्वज्ञात आहेत. गतवर्षी ज्या पद्धतीने संबंधितांना मदत अथवा सहानुभूती मिळाली ती यानंतरच्या काळात पुन्हा मिळेल याबाबत साशंकता आहे.

त्यामुळे प्रामुख्याने ज्या-ज्या गावात वरच्या भागातील डोंगर खचले, दुभंगले आहेत किंवा अतिवृष्टीमध्ये पुन्हा भूस्खलनाचा धोका आहे, काही गावं दरड, कड्याखाली वास्तवात असून गावांच्या वरच्या भागावर मोठे सुटलेले कडे, डोंगर असल्याने त्या ठिकाणची गावे पूर्णपणे धोकादायक बनलेली आहेत. आपला मौल्यवान जीव धोक्यात घालून आपत्तीचा अतिआत्मविश्‍वासाने धोका पत्करणे हे वैयक्तिक व सार्वजनिक हिताचे ठरणार नाही याचीही नोंद आवश्यक आहे. शासन, प्रशासनाकडून याबाबत जनजागृती, खबरदारी, उपाययोजना घेण्यात येत असल्या तरीदेखील त्याला कमालीच्या मर्यादा आहेत. सध्या पावसाचा जोर वाढत चालल्याने गतवर्षी प्रमाणेच संभाव्य अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन या धोक्यांचा विचार करता आता प्रत्येकानेच आपापल्या परीने वैयक्तिक व सार्वजनिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Back to top button