शिंगणापुरातील वाहतूक कोंडी; व्यावसायिकांची डोकेदुखी | पुढारी

शिंगणापुरातील वाहतूक कोंडी; व्यावसायिकांची डोकेदुखी

शिखर शिंगणापूर : शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना अनेक दिवसांपासून वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. शिंगणापूर ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या वाहनकर वसुलीमुळे बसस्थानक परिसरात वाहनांच्या रांगा लागत असून वारंवार होणारी कोंडी स्थानिक व्यावसायिकांची डोकेदुखी बनली आहे.

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील लाखो भाविकांनी शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. बेशिस्त वाहतूक व नियोजनाचा अभाव यामुळे शिंगणापुरात येणार्‍या लाखो भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच शिंगणापूर ग्रामपंचायतीने अलीकडेच येणार्‍या भाविकांच्या वाहनांना प्रवेशकर सुरु केला आहे. बसस्थानक परिसरात असलेल्या या वाहनकर वसुली नाक्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.

ऐन आषाढी पंचमीच्या दिवशी ग्रामपंचायतपासून 200 ते 300 मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या परिसरातील व्यवसायिकांच्या दुकानांसमोर वाहने उभी राहिल्याने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय मंदिराकडे जाणार्‍या-येणार्‍या एसटी वाहनचालकांनाही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. एसटी चालकांना बसस्थानकात बसेस नेताना कसरत करावी लागत असून खासगी वाहनधारकांचाही गोंधळ उडत आहे. येत्या 15 दिवसांत श्रावण महिना सुरु होत असून महिनाभर भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे श्रावणात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासन व ग्रामपंचायतीने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी भाविकांतून होत आहे. तर बसस्थानक परिसरातील असलेले वाहनकर वसुलीचे ठिकाण बदलण्याची मागणीही जोर धरु लागली आहे.

Back to top button