सातारा : आषाढी, बकरी ईद एकोप्याने साजरी करु

सातारा : पुढारी वृत्तसेवा
काही दिवसांवर आषाढी एकादस व बकरी ईद होत असून हिंदू व मुस्लिम बांधवांनी सातारची परंपरा जपत एकोप्याने दोन्ही साजरे करावेत, असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले. येथील पोलिस करमणूक केंद्रामध्ये शांतता कमिटीची बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अप्पर पेालिस अधीक्षक अजित बोर्हाडे, मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, गेली दोन वर्षे कोरोनात गेली आहेत. यामुळे हे सर्व साजरे करताना अनेक निर्बंध होते. आता मात्र निर्बंध नाहीत. यामुळे सर्वांनी आपले सण उत्साहात साजरे करावेत. मात्र कोरोना अद्याप गेलेला नाही. उपस्थित सर्वांमध्ये केवळ एका व्यक्तीने मास्क घातलेला आहे. त्या व्यक्तीचे मनापासून अभिनंदन. सर्वांनी मास्क स्वत:साठी, कुटुंबियांसाठी व समाजासाठी वापरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
एसपी अजयकुमार बन्सल म्हणाले, पोलिस प्रशासन सज्ज असून सण साजरे करताना गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. देशात वेगवेगळ्या मुद्यांवरुन अनेक ठिकाणी वातावरण बिघडले होते. सातार्यात मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. हीच परंपरा सातारा जिल्हावासीयांनी जपावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, सातार्यातील नगरसेवक, विविध पक्षाचे पाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.