सातारा : जिल्ह्यावर कोरोनाचे संकट गडद

सातारा : पुढारी वृत्तसेवा
मुंबई, पुण्यात गत काही महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा आलेख पूर्णत: खाली होता. जून महिन्यात रुग्ण संख्येत भर पडू लागली असून भीतीचे सावट गडद झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी तब्बल 68 जणांचा अहवाल बाधित आला असून एकट्या फलटणमध्ये 24 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी बाधित रूग्णांची संख्या मोठी आली आहे. दि. 6 रोजीच्या अहवालात 571 जणांची कोरोना टेस्ट केल्यानंतर 68 जणांचा अहवाल बाधित आला आहे. यात फलटण 24, सातारा 14, खटाव 6, कोरेगाव 6, खंडाळा 5, कराड 4, वाई 4, पाटण 2, माण 1, महाबळेश्वर 1 व इतर 2 असे बाधित आढळले आहेत. यामुळे दैनंदिन कोरोना पॉझिटिव्हीटी दर 11.91 टक्क्यांवर पोहोचला आहे. आजमितीस जिल्ह्यातील सक्रीय कोरोना रुग्ण संख्या 190 झाली आहे. यापैकी 18 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. तर उर्वरित रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. या 18 रुग्णांपैकी कोणाचीही स्थिती गंभीर नाही तर 25 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर चांगला असून तो 97.52 टक्के एवढा आहे तर मृत्यू दर 2.40 टक्के झाला आहे.मात्र, अचानकपणे गत दोन वाढू लागलेल्या कोरोनाच्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये तसे संभ्रमाचे वातावरण आहे. दोन दिवसात पावसाचे प्रमाण जिल्ह्यात बर्यापैकी आहे. अल्प प्रमाणात असलेला कोरोना संसर्ग दोन दिवसात उसळी मारु लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.