सातारा : घरगुती गॅस दरवाढीचा पुन्हा भडका | पुढारी

सातारा : घरगुती गॅस दरवाढीचा पुन्हा भडका

सातारा : पुढारी वृत्तसेवा

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे महाग झाले असतानाच स्वयंपाकाच्या गॅसदरवाढीचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे.स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर 50.50 रुपयांची वाढ झाल्याने आता एका सिलेंडरची किंमत तब्बल 1 हजार 55.50 रुपये झाली असून प्रवासखर्चासह 1 हजार 65 ते 75 रुपये मोजावे लागणार आहेत. मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले असताना दर महिन्याला होणार्‍या गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे महिन्याचे बजेट कोलमडून जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा आलेख उंचावला आहे.अन्नधान्यापासून भाजीपाल्यापर्यंत महागाईच्या झळा बसत आहेत. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. डाळी महागल्या तर हिरव्या भाज्यांचा पर्याय देता येतो. मात्र स्वयंपाकाच्या गॅसला पर्याय उरलेला नाही. मागील तीन महिन्यात तब्बल चार वेळा स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची दरवाढ झाली आहे. मे महिन्यामध्ये 7 मेला 50 रुपये तर 19 मेला 3.50 रुपये अशी दोन वेळा दरवाढ झाली होती.

आता पुन्हा गॅसदरवाढीचा भडका उडाला आहे. घरगुती वापराचा 14.2 किलोचा गॅससिलेंडर 50.50 रुपयाने महागल्याने एका सिलेंडरची किंमत 1 हजार 55.50 रुपये होणार आहे.होम डिलीवरी असतानाही 15 ते 20 रुपयांपर्यंत प्रवास खर्च द्यावा लागत असल्याने एका सिलेंडरसाठी 1065 ते 1070 रुपये मोजावे लागणार आहेत. 5 किलोच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीमध्येही 18 रुपयांनी वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. तर सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे.

वाढत्या महागाईमुळे कष्टकरी वर्गासह सर्वसामान्यांचे जगणे महाग झाले आहे दरम्यान, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 8.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना मागील काही दिवसांपासून व्यावासायिक सिलेंडरच्या दरात मात्र वारंवार कपात करण्यात येत असल्यानेे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

उज्वला गॅस नावापुरतेच…

दारिद्—य रेषेखालील कुटुंबांना शासनाने उज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस कनिक्शन व सिलेंडर दिले आहेत. मात्र कोरोना काळापासून उज्वला योजनेसह सर्वच सिलेंडरची सबसिडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करुन उदरनिर्वाह करणार्‍या वर्गासाठी महिन्याकाठी सिलेंडरसाठी 1065 रुपये बाजूला काढणे शक्य होत नाही. त्यामुळे उज्वला योजनेतील बहुतांश गॅस सिलेंडर वापराविना पडून असल्याने नावापुरतेच उरले आहेत. या कुटुंबातील महिलांना पुन्हा चुलीची धुराडी फुकावी लागत आहेत.

Back to top button