सातारा : सहकारच्या निवडणुकांची गाडी सुसाट | पुढारी

सातारा : सहकारच्या निवडणुकांची गाडी सुसाट

सातारा : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निवडणुकांचा सपाटा लावला आहे. जिल्ह्यातील सर्व विकास सेवा सोसायट्यांची निवडणूक झाल्यानंतर सहकारी साखर कारखाने व नागरी सहकारी बँकांच्या निवडणुका सुरू झाल्या असून, जिल्ह्यात सहकाराच्या निवडणुकांची गाडी सुसाट सुटली आहे. दरम्यान, सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारमध्ये कोण सहकारमंत्री होते? व वेगळे काय आदेश दिले जातात की नाही याकडे नजरा लागल्या आहेत.

मे 2020 मध्ये जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्थांच्या मुदती संपल्या होत्या. परंतु, मार्च 2020 मध्ये कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव केल्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागला होता. दोन वर्षे कोरोनात गेल्याने अनेक संस्थांमधील संचालक मंडळांना मुदतवाढ दिली तर अनेक संस्थांवर प्रशासक नेमण्यात आले.

मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सहकारातील निवडणुकांना सुरुवात झाली. अगदी कमी कालावधीमध्ये या निवडणुका पूर्ण करण्याचे आवाहन सहकार विभागाला होते. मात्र, प्रारंभी महत्त्वाची असलेली जिल्हा बँकेची निवडणूक झाली. त्यानंतर क व ड वर्गातील पतसंस्था, सोसायट्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या. विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुका रखडल्याने बाजार समितींच्या निवडणुका होवू शकल्या नाहीत. त्यामुळे प्राधान्यांने विकास सेवा सोसायट्या संपवण्याचा टास्क जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आला. याच दरम्यान किसनवीर कारखान्याची निवडणूक झाली.

त्यानुसार जिल्ह्यातील 800 हून अधिक सोसायट्यांच्या निवडणुका घेतल्या आहेत. तर आता अजिंक्यतारा, रयत, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. याचबरोबर सैनिक, रयत बँकेचे धुमशानही सुरू झाले आहे. तर शिक्षक बँकेसाठी मतदार यादी फायनल झाली आहे. खरेदी विक्री संघ आणि ग्राहक संघाच्याही निवडणुका काही दिवसात होणार आहेत. त्यानंतर पुढील महिन्यात बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार विभाग सध्या निवडणुकांवर फोकस करत असल्याचे चित्र आहे.

निवडणुकांबाबत सरकारच्या सूचना नाही

सत्तांतर झाल्यानंतर पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलण्यात येणार असल्याचे नव्या उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पुढील घडामोडी घडतील. सहकारच्या विषयात सध्या कोणत्याही सूचना अधिकार्‍यांना प्राप्‍त झाल्या नाहीत. त्यामुळे सध्या लागलेला निवडणूक कार्यक्रम तसाच सुरू राहणार आहे. अद्याप सर्व रूटीन सुरू असले तरी पुढील काही दिवसात सूचना आल्यास कार्यवाही होणार आहे.

Back to top button